Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यासाठी शनिवार घातवार ठरला. जिल्ह्यातील वेगवेगळ्या अपघातामध्ये 5 जणांचा बळी गेला. दरम्यान, अत्यंत भीषण आणि अंगावर शहारे आणणारी घटना इचलकरंजीमध्ये घडली. इचलकरंजीमधील गणेशनगरमध्ये रेल्वे पोलिसांच्या गाडीखाली चिरडून अवघ्या 12 वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. उतरणीला पोलिसांचे वाहन मागे येऊन हा अपघात घडला. राज सुरेश चव्हाण असे दुर्दैवी अंत झालेल्या मुलाचे नाव आहे. शहापूर पोलिसांनी वाहनचालक सूर्यकांत अप्पासाहेब कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
राज आणि त्याचा मित्र खेळत असतानाच गाडी मागून आल्याने राज गाडीसोबत फरफटत गेला. त्यानंतर मंदिराची भिंत आणि गाडीच्या मध्ये राज चिरडला गेल्याने नागरिकांनी गाडी बाजूला करून त्याला बाहेर काढले. मात्र, तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
कागल तालुक्यात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
कागल तालुक्यातील कागल निढोरी मार्गावर पिंपळगावकडे जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार शामराव बाबू सुर्यवंशी (वय 60 रा. पिंपळगाव बुद्रुक) यांचा मृत्यू झाला. या घटनेत आनंदा शंकर मांगोरे जखमी झाले. अपघातात शामराव सुर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.
करवीर तालुक्यात महामार्ग ओलांडताना मेंढपाळाचा मृत्यू
करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगावजवळ राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना टँकरने धडक दिल्याने शिवाजी धोंडिराम हजारे (वय 76, रा. सिद्धनेर्ली, ता. कागल) यांचा जागीच मृत्यू झाला. ते हरवलेला घोडा शोध घेत होते.
शिरोळ तालुक्यात महिला ठार, पती गंभीर जखमी
शिरोळ तालुक्यात घोसरवाड हद्दीत राधाकृष्ण ऊस रोपवाटिकेजवळ समोरू येणाऱ्या जीपने धडक दिल्याने सुवर्णा सुनील माळी (वय 50, रा. इचलकरंजी) यांचा मृत्यू झाला. या अपघातात सुवर्णा यांचे पती सुनील गंभीर जखमी झाले. डोक्याला मार लागल्याने सुवर्णा जागीच गतप्राण झाल्या.
सहाव्या मजल्यावरून पडून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू
कोल्हापूर शहरातील लक्षतीर्थ वसाहतीमध्ये काम करत असताना सहाव्या मजल्यावरून पडून सेंट्रिंग कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अभिजित बिस्वास असे त्या कामगाराचे नाव असून तो मुळचा पश्चिम बंगालमधील होता. उपचारादरम्यान त्याचा सीपीआरमध्ये मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या