Kolhapur News : कुष्ठरुग्ण शोध मोहीम व सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान राबविण्यात येत असून यासाठी आवश्यक ते नियोजन करुन ही मोहीम प्रभावीपणे राबवा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या. कुष्ठरोग व क्षयरोग जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे, कुष्ठरोग विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा कुंभार तसेच समिती सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की, क्षयरोग निर्मूलनाच्या शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे गतवर्षी कोल्हापूर ग्रामीणसाठी रौप्य पदक मिळाले असून यावर्षी सुवर्ण पदकासाठी नामांकन झाले आहे. यासाठी नवीन क्षयरुग्ण सापडण्याचे प्रमाण 2015 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी कमी होणे आवश्यक आहे.
यादृष्टीने सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेचा उपयोग होईल व कोल्हापूर जिल्हा क्षयमुक्त होण्यासाठी मदत होईल. सर्वांनी या मोहिमेत संशयितांची तपासणी करुन घेऊन निदान झालेल्या रुग्णांना वेळेत मोफत औषधोपचार द्यावेत, असे सांगून या मोहिमेत खासगी डॉक्टरांनाही सहभागी करुन घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिल्या.
या शोध मोहिमेसाठी एक आशा कार्यकर्ती किंवा स्त्री स्वयंसेविका व एक पुरुष स्वयंसेवक यांची एक याप्रमाणे 2 हजार 684 टीम स्थापन करण्यात आल्या असून याद्वारे त्यांना नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील लोकांची गृहभेटीद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. याद्वारे समाजातील निदर्शनास न आलेले प्राथमिक अवस्थेतील कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण या आजाराचे रुग्ण शोधून औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
2 हजार 684 टीममध्ये 5 हजार 374 सदस्य 14 दिवसांत सर्वेक्षण करणार
या अभियानाकरिता ग्रामीण भागासाठी निवडलेली लोकसंख्या 31 लाख 37 हजार 420
- एकूण घरे 6 लाख 82 हजार 49
- एकूण टीम 2 हजार 464
- एकूण टीम सदस्य 4 हजार 935
- एकूण पर्यवेक्षक 495.
या अभियानासाठी शहरी भागासाठी निवडलेली लोकसंख्या 3 लाख 47 हजार 729
- एकूण घरे 75 हजार 594
- एकूण टीम- 219
- एकूण टीम सदस्य 440
- एकूण पर्यवेक्षक 42.
अभियानासाठी एकूण निवडलेली लोकसंख्या- 34 लाख 85 हजार 149
- एकूण घरे- 7 लाख 57 हजार 643
- एकूण टीम- 2 हजार 684
- एकूण टीम सदस्य 5 हजार 374
- एकूण पर्यवेक्षक 537
कुष्ठरोग लक्षणे कशी असतात? (What are the symptoms of leprosy)
- त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे
- जाड, बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा
- त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्या जाड होणे
- भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे
- तळहातावर व तळपायावर मुंग्या येणे, बधीरपणा अथवा जखमा असणे
- हाताची व पायाची बोटे वाकडी असणे, हात मनगटापासून किंवा पाय घोट्यापासून लुळा पडणे
- त्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे
- हात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणे, हातातुन वस्तु गळून पडणे, चालताना पायातुन चप्पल गळून पडणे
क्षयरोग लक्षणे काय असतात? (What are the symptoms of tuberculosis)
- दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला
- दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा ताप
- वजनात लक्षणीय घट
- थुंकीवाटे रक्त येणे