कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (11 ऑगस्ट) काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी अजितदादा पवार यांनी पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचे सांत्वन केले. यावेळी लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या मुद्यावर देखील चर्चा झाली.


बंटींनी की पी एन साहेबांनी जास्त इंटरेस्ट दाखवला?


अजित पवार म्हणाले की, पी. एन. साहेब यांनी वयोमानानुसार जेवढा झेपेल तेवढा प्रचार करायला हवा होता. असे म्हणताच कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आणि पी. एन. पाटील यांच्या मैत्रीबद्दल सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी शाहू महाराजांच्या खासदारकीसाठी बंटींनी की पी एन साहेबांनी जास्त इंटरेस्ट दाखवला असा  सवाल केला.


पी. एन. पाटलांच्या करवीरमधून शाहू महाराजांना सर्वाधिक लीड


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. शाहू महाराज यांनी संजय मंडलिक यांचा पराभव केला. टपाली मतदानापासून घेतलेली आघाडी मतदानाच्या शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यामुळे शाहू महाराज यांनी एकतर्फी विजय मिळवला. मात्र, गड आला पण सिंह गेला अशी जिल्हा काँग्रेससह कार्यकर्त्यांची झाली. करवीर विधानसभा मतदारसंघातून शाहू महाराज यांना सर्वाधिक लीड मिळाले आहे. मात्र, त्या मतदारसंघाचे पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाल्याने ते विजय पाहू शकले नाहीत. 


गड आला पण सिंह गेला


ज्या मतदारसंघांमधून संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा होती, त्या कागल चंदगड राधानगरी या तीन विधानसभा मतदारसंघांमधून सुद्धा शाहू महाराजांना तेथील जनतेने साथ दिली.शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य करवीर विधानसभा मतदारसंघातून मिळालं. पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाल्याने हा विजय पाहण्यासाठी ते नसल्याने कार्यकर्ते भावूक झाले होते. त्यामुळे शाहू महाराजांना मोठं लीड देण्यामध्ये स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले.  


शाहू महाराज यांना आपण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी पायाला भिंगरी लावून एक महिना प्रचार केला होता. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात करवीरमध्येच सर्वाधिक 80 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे करवीरमधील मतदान हे शाहू महाराजांच्या विजयासाठी निर्णायक होते. आलेल्या निकालामध्ये सुद्धा करवीरने शाहू महाराजांना विजय निश्चित केल्याचे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी म्हणायची वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस नेतृत्व सुद्धा आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या