Coronavirus : जगभरात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. भारतातही कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार कायम आहे. ही परिस्थिती एकाबाजूला असताना कोल्हापूरला मोठा दिलासा गेल्या दोन महिन्यांपासून मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे मृताची सुद्धा नोंद झालेली नाही.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापुरात (kolhapur coronavirus update) विदारक परिस्थिती झाली होती. कोरोनामुळे अनेक घरे, कुटुंब उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यात कोरोना महामारी आल्यापासून 2 लाख 21 हजार 770 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. बाधित रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 838 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला, तर 5 हजार 932 रुग्ण मृत्युमूखी पडले. शरीरामध्ये इतर व्याधी असल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने तसेच कोरोना झाल्यानंतर मृत्यूच ओढवतो अशा अनामिक भीतीने सुद्धा अनेक या रोगाला बळी पडले आहेत.
कोल्हापुरात 37 हजार बुस्टर डोस कचऱ्यात टाकून देण्याची वेळ!
दरम्यान, चीनमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा उद्रेक केल्यानंतर जगभरातून पुन्हा एकदा भीतीचे वातावरण आहे. कोरोना महामारीमधील पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील हाहाकार पाहिल्यानंतर प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु करण्यात आले. पहिल्या आणि दुसऱ्या डोसला देशभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र, कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बुस्टर डोसकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे अनेक ठिकाणी बुस्टर डोस आता टाकून देण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही 37 हजारांवर डोस (Corona Booster Dose) टाकून देण्याची वेळ आली. आता नव्याने 20 हजार डोसची मागणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूरमधील आरोग्य विभागाकडे शिल्लक असलेल्या सुमारे 37 हजार बूस्टर डोसची मुदत 31 डिसेंबर रोजी संपली. दोन डोसनंतर घेतल्यानतंर सहा महिने झाल्यानंतर सहा महिन्यांनी बुस्टर डोस देण्यात येत होता. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्याने तसेच निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर लसीकरणाकडे पाठ फिरवली गेली.
आरोग्य विभागाकूडन लोकसंख्येच्या प्रमाणात डोसची मागणी केली होती. परंतु, पाच टक्केच लोकांनी बुस्टर डोस घेतला आहे. शिल्लक असलेल्या बुस्टर डोसची मुदत 31 डिसेंबर 2022 रोजी संपली. कोल्हापूर जिल्ह्यात जवळपास 90 ते 95 टक्के, तर 85 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला. मात्र, तुलनेत बूस्टर डोसलाफारसा प्रतिसाद मिळाला नाही. केवळ पाच ते सहा टक्के नागरिकांनीच गोष्ट डोस घेतल्याने डोस शिल्लक राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या