Govind Pansare Murder Case: कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित समीर विष्‍णू गायकवाड (रा. सांगली) याच्याकडून अटकेवेळी जप्त केलेले दोन मोबाईल पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले. पंचाने गायकवाडलाही जागेवर जाऊन ओळखले. साक्षीदारांच्या यादीतील हा सहावा पंच आणि साक्षीदार आहे. पानसरे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर मंगळवारी झाली. त्यात पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव यांचा सरतपास आणि उलट तपास झाला. पुढील सुनावणी 3 आणि 4 जुलैला होणार आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह सर्व संशयित आणि त्यांचे वकील न्यायालयात हजर होते.


सुनावणीस प्रारंभ झाल्यानंतर ॲड. राणे यांनी पंच जाधव यांना समीर गायकवाडला अटक केली तेव्हा काय काय झालं? काय जप्त केलं? आदी प्रश्न विचारतानाच इतर प्रश्नही विचारले. उत्तरात पंच जाधव यांनी गायकवाडकडे अंग झडतीवेळी एक स्मार्टफोन आणि एक साधा फोन मिळाल्याचे सांगितले. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख यांनी बोलविल्यामुळे मी आणि माझा शेजारचा मित्र करण शंभू यादव पोलीस ठाण्यात गेलो होतो. यावेळी त्याच्या अंगात ग्रे टी-शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट होती. पॅन्टच्या खिशातून मोबाईल संच जप्त केल्याचे जाधव यांनी सांगितले.


त्याच्या अंगावरील खुणा तपासून पोलिसांनी अटकेचा पंचनामा केला. आरोपीला ओळखू शकाल का? असे विचारल्यावर जाधव यांनी बोट करून समीर गायकवाड हाच असल्याचे दाखविले. नंतर संशयित बसलेल्या ठिकाणी जाऊन इतर संशयितांमध्ये बसलेला गायकवाड हाच असल्याचे सांगितले. संशयितांतर्फे ॲड. रवींद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन, ॲड. प्रवीण करोशी, ॲड. ए. एस. रुईकर आणि ॲड. डी. एम. लटके यांनी पंच आणि साक्षीदार जाधव यांची उलट तपासणी घेतली. 


दरम्यान, अटक पंचनाम्यावेळी पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल ओळखण्यासाठी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर बॉक्स हजर करण्यात आला. सुरुवातीला, दुसराच बॉक्स उघडण्यात आला. संशयित आरोपी समीर गायकवाडचे दोन्ही मोबाईल एकाच ठिकाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष समीरचा एक आणि दुसरा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मोबाईल आढळून आला. दरम्यान, खटल्यातील सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपींना सकाळी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या