कोल्हापूर : कोल्हापूर-बालिंगे-कळे-साळवण ते गगनबावडा या मार्गावरील जुन्या दगडी कमानी पुलाखालून वाहणाऱ्या पूराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे बालिंगा पुलावरून वाहतूक आजपासून थांबवण्यात येणार आहे. आज (25 जुलै) सायंकाळी चार चाकी वाहने थांबवण्यात येणार असून संध्याकाळी लहान वाहने पूर्णपणे थांबवण्यात येणार आहेत. हवामान खात्याच्या अंदाजवरुन जिल्ह्यात पाणी-पातळी अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वित्त व जिवित हानी थांबविण्यासाठी बालिंगामधील जुन्या दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्र.2 चे उपअभियंता आर.बी.शिंदे यांनी दिली आहे.
पुराच्या पाण्याची पातळी धोका पातळीपासून खाली पोहोचेपर्यंत या पुलावरुन वाहतुक बंद करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा उदा. रुग्णवाहिका, दुधाच्या गाड्या, भाजीपाला वाहतुक सुरु राहील. स्थानिक नागरिक व या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही श्री. शिंदे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवर
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. बालिंगा पुलाजवळ पाणी पातळी मच्छिंद्रीपेक्षाही दीड फुटाने वाढली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे 138 वर्षाचा ब्रिटिश कालीन दगडी पूल आहे. मच्छिंद्री होताच मागील वर्षी सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून होणारी सर्व वाहतूक बंद केली होती.
सायंकाळी 5:00 वाजता : राजाराम बंधारा पाणी पातळी
43'-04" ( 543.39 m) विसर्ग 63003 Cusecs
( पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी - 43'00")
एकुण पाण्याखाली बंधारे - 85
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी
भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी, खडक कोगे, सरकारी कोगे, तारळे व शिरगांव
तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी
कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेण, वालोली व कुंभेवाडी कुंभी नदीवरील- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली
धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, गवशी, गाटीवडे
वारणा नदीवरील -चिंचोली, माणंगाव, कोडोली, शिगांव, खोची, तांदूळवाडी व दानोळी
कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिगांव, सवतेवाडी व सरुडपाटणे
शाळी नदीवरील- येळाणे
दुधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, सुळकूड, बाचणी व दत्तवाड
वेदगंगा नदीवरील- निळपण, वाघापूर, गारेगोटी, म्हसवे, कुरणी, बस्तवडे, शेणगांव व चिखली
हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, ऐनापूर, निलजी, गिजवणे,जरळी
घटप्रभा नदीवरील- कानडे सावर्डे, पिळणी, बिजूरभोगोली, हिंडगांव, तारेवाडी, कानडेवाडी व आडकूर
ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे, कोवाड, माणगाव, ढोलगरवाडी व जंगमहट्टी असे एकूण 85 बंधारे पाण्याखाली आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या