Ashwini Bidre Murder Case : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या खुनाचा मुख्य आरोपी आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला बडतर्फ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर अजूनही पोलीस खात्याचा जावई आहे का? असा संतप्त सवाल मयत अश्विनी यांचे पती राजू गोरे यांनी उपस्थित केला आहे. कुरुंदकरने आपल्या मुलाच्या लग्नासाठी तुरुंगातून अर्जित रजा (पॅरोल) मिळावी म्हणून केलेल्या अर्जाची प्रत देण्यास राजारामपुरी पोलिसांनी नकार दिला. यानंतर राजू गोरे यांनी संताप व्यक्त केलाय. तर गोरे यांनी कुरुंदकरला पॅरोल देण्यास स्पष्ट विरोध दर्शवला आहे.
अभय कुरुंदकर सध्या छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. येत्या 20 जून रोजी कोल्हापुरात त्याच्या मुलाचे लग्न आहे. त्यासाठी अर्जित रजा मिळावी, अशी विनंती त्याने कारागृह प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार कारागृह प्रशासनाने राजारामपुरी पोलिसांना पत्र पाठवून लग्न कुठे आहे?, कधी आहे? याचे तपशील मागवले आहेत. तसेच, त्या गुन्ह्यातील फिर्यादी राजू गोरे यांचा जबाब घेऊन पाठवण्याची विनंती केली आहे.
कुरुंदकर तुमचा शत्रू असेल, आमचा नाही
या पार्श्वभूमीवर राजारामपुरी पोलीस स्टेशनने कुरुंदकरच्या अर्जाचा तपशील गोपनीय ठेवत गोरे यांना फक्त जबाब नोंदवण्यासाठी बोलावले होते. प्रत मागितल्यावर पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी "कुरुंदकर तुमचा शत्रू असेल, आमचा नाही, " असे म्हटल्याची माहिती गोरे यांनी दिली. तर "गुन्हेगार जर पोलिसांचा ‘शत्रू’ नसेल, तर मग जनतेचा काय विश्वास राहील? असा सवाल गोरे यांनी उपस्थित केला आहे.
आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही?
राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हा अर्ज किंवा या अर्जाबाबत माहिती का लपवतात? की कुरुंदकरबरोबर त्यांचे काही लागेबांधे आहेत? की काही अर्थकारण आहे. आम्हाला न्याय मिळणार आहे की नाही? की सत्तेचा माज असाच चालणार आहे, असा संताप देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. तर राजू गोरे यांनी बडतर्फ पोलीस अधिकारी कुरुंदकर आणि तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. कारागृह विभागाचा कार्यभार सांभाळताना सुपेकर यांचा संपर्क कुरुंदकर आणि त्याच्या कुटुंबीयांशी झाला असावा, आणि पॅरोल अर्ज प्रक्रियेत त्यांचा अप्रत्यक्ष हस्तक्षेप असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण काय?
नवी मुंबईतील कळंबोली येथून 15 एप्रिल 2016 रोजी पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे या अचानक बेपत्ता झाल्या. त्यामागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांचा हात असल्याचा गंभीर आरोप अश्विनी यांच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाच्या तपासात सुरुवातीला पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोपही बिद्रे कुटुंबाकडून करण्यात आला होता. अश्विनी यांचा विवाह 2005 साली हातकणंगले गावातील राजू गोरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर एकाच वर्षात त्यांनी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती मिळवली. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली नेमणूक पुणे येथे, तर त्यानंतर सांगली येथे झाली. याच काळात सांगलीतील पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. हळूहळू त्यांच्यात जवळीक निर्माण झाली.
2013 साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्यामुळे त्यांची बदली रत्नागिरी येथे झाली. मात्र, कुरुंदकर तिथेही अश्विनीला भेटण्यासाठी वारंवार येत होता. हे सर्व प्रकार अश्विनी यांचे पती आणि वडिलांच्या लक्षात आले. या नंतर अश्विनी आणि कुरुंदकर यांच्यात वारंवार वाद होऊ लागले. वाद इतके टोकाचे झाले की, अभय कुरुंदकरने अश्विनीला 'गायब' करण्याची धमकी अश्विनीच्या पतीला दिली, असा दावा करण्यात आला. 2015 मध्ये अश्विनी यांची बदली नवी मुंबईतील कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र, त्या ठिकाणी त्या हजरच झाल्या नाहीत. या बाबत पोलिस खात्याकडून त्यांच्या गैरहजेरीवर प्रश्न उपस्थित करणारे पत्र पाठवण्यात आले. त्यानंतरच अश्विनी यांचे कुटुंबीय सतर्क झाले आणि त्यांना त्या बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने कळंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर तपासात अश्विनी यांची क्रूर पद्धतीने हत्या करून मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला एप्रिल 2025 साली जन्मठेप आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आणखी वाचा