Ashok Chavan : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीमध्ये नेतृत्व बदलावरून घमासान सुरू असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येही चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये समन्वय हरवून गेला आहे का? अशी वक्तव्ये गेल्या 24 तासांमधून होत आहेत. संजय राऊत यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फटकारल्यानंतर संजय राऊत यांनीही त्यांच्या नेहमीच्या शैलीत प्रत्युत्तर दिले. आता दोघांमध्ये वाद रंगला असतानाच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आता संजय राऊत यांना चिमटा काढला आहे. 


या वादाला नेमकी सुरुवात तरी कशी झाली?


संजय राऊत यांनी आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत, असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर केला. राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्याची चूक करेल असं वाटत नाहीय शरद पवार फुले आंबेडकर विचारांचे असून ते भाजपसोबत जाणार नाहीत, असा आमचा विश्वास आहे. संजय राऊत यांनी चोंबडेगिरी थांबवावी ते काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी आमचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या क्षमतेवर आणि गांधी कुटुंबाच्या प्रतिष्ठेबद्दल काही बोलू नये असे नाना पटोले म्हणाले. 


संजय राऊतांकडून नाना पटोलेंना  प्रत्युत्तर


यानंतर अर्थातच नाना पटोले यांच्या टीकेला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की नाना पटोले यांना त्यांचा पक्षच गांभीर्याने घेत नाहीत. नाना पटोले यांच्यापेक्षा राहुल गांधी माझ्याशी जास्त बोलतात. त्यामुळे दोघांच्या कलगीतुऱ्यात काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगला चिमटा काढला.


अशोक चव्हाण म्हणाले की तिन्ही पक्षाच्या आघाडी असल्याने काही वेळा शाब्दिक गोष्टी होत असतात. हा गंभीर विषय नाही काँग्रेस पटोले यांना गांभीर्याने घेत नाही असं म्हणता येणार नाही. नाना पटोले हे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेतय तिन्ही पक्षांनी काळजी घेतली पाहिजे, आम्ही टोकाला जाणार नाही अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले पाहिजेत असे त्यांनी यावेळी नमूद केले. ते म्हणाले की, ज्यावेळी सरकार स्थापन होत असते त्यावेळी आपली ताकद दाखवावी लागते, काळजी घ्यावी लागते. सोनिया गांधी, काँग्रेसने अनुमती दिली नसती तर त्यावेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं नसतं, असा दावाही त्यांनी यावेळी केला. 


इतर महत्वाच्या बातम्या