Maratha Scholarship: सारथी संस्थेमार्फत आठवीमध्ये NMMS परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मराठा विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती महायुती सरकारकडून अचानक बंद करण्यात आल्याने मराठा महासंघाने कडाडून विरोध केला आहे. महिन्याला नऊशे रुपये शिष्यवृत्ती म्हणून दिले जात होते. चार वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती मिळत होती. मात्र, ही शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाने 70 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याचे म्हटलं आहे. एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना वर्षाला 9 हजार 600 रुपये शिष्यवृत्ती मिळते. चार वर्षांसाठी मंजूर झालेली शिष्यवृत्तीमध्येच बंद झाल्याने वसंतराव मुळीक यांनी नाराजी व्यक्त केली. शिष्यवृत्ती अचानक बंद का केली? अशी विचारणा त्यांनी केली. शिष्यवृत्ती मध्येच बंद करता येणार नाही, अन्यथा मराठा समाजाचा हिसका दाखवू, असा इशारा त्यांनी दिला आहे. मराठा महासंघाने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं असून शिष्यवृत्ती पूर्ववत करावी, अशी मागणी केली आहे.  

Continues below advertisement

काय म्हटलं आहे निवेदनात?

महाराष्ट्र शासनाने अचानक सारथीकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्याचा एकतर्फी निर्णय घेतला असून 70000 पेक्षा जास्त मराठा विद्यार्थी वंचित राहणार आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 17000 विद्यार्थी लाभार्थी आहेत. सारथी संस्थेमार्फत इयत्ता 8 वी मध्ये एनएमएमएस परीक्षेत उत्तीर्ण मराठा विद्यार्थ्यांना मासिक 900 रुपये शिष्यवृत्ती 4 वर्षांसाठीदिली जात होती. परंतु मध्येच शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेताल्याने मराठा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होवून त्यांना मानसिक त्रास होणार आहे.

शासनाने एकतर्फी निर्णय घेऊन काय साध्य केलं

मराठा समाजातील वार्षिक अडीच लाख उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत होता. आजघडीला शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना 40 कोटीपर्यंत शिष्यवृत्ती अदा करणे गरजेचं होते. ती शिष्यवृत्ती न देता शासनाने एकतर्फी निर्णय घेऊन काय साध्य केलं आहे? राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने कार्यरत सारथीला त्यांच्या विचारांचा विसर पडला आहे. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत केले होते. तसेच दीन दलितांना शिष्यवृत्ती दिल्या होत्या. परंतु शाहूंच्या विचाराने वारसा जपत सारची संस्थेने शैक्षणिक उन्नतीसाठी काम करणे अपेक्षित असताना संचालक मंडळाने मध्येच शिष्यवृत्ती बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्या विचारला तिलांजली दिली आहे. मराठा समाजातील 70 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती राज्य शासनाने ताबडतोब सुरु करावी, अन्यथा मराठा महासंघ अन्यायग्रस्त विद्यार्थी सारथी विरोधात रस्त्यावर आंदोलन करणार असून या आंदोलनाची जबाबदारी शासनाची राहिल, असा इशारा देण्यात आला आहे. 

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या