Ajit Pawar In Kolhapur : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) उद्या (17 फेब्रुवारी) कागल (Kagal) दौऱ्यावर येत आहेत. गेल्या महिनाभरापासून आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) ईडीच्या रडारवर आहेत. दोनदा ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या दौऱ्यात आमदार हसन मुश्रीफ जोरदार शक्तीप्रदर्शाच्या तयारीत आहेत. अजित पवार यांचा दौरा आणि शिवजयंतीच्या माध्यमातून हसन मुश्रीफ आपली ताकद दाखवतील अशी चर्चा रंगली आहे.  


दरम्यान, अजित पवार यांच्या कागल दौऱ्यात कागल शहरातील श्रमिक वसाहतीमधील राजमाता जिजाऊ माँसाहेब या बगीचाचे लोकार्पण, बस स्टॅन्ड परिसरात कागलचे अधिपती श्रीमंत जयसिंगराव महाराज (बाळ महाराज) पुतळा सुशोभीकरण, निपाणी वेस येथील राधाकृष्ण मंदिराचा विस्तारित सभामंडप या विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता गैबी चौकामध्ये शेतकरी, युवक व महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. 


शिवजयंतीला कागलमध्ये जंगी कार्यक्रम 


दरम्यान, रविवारी शिवजयंतीदिनी निपाणी वेस येथे शिवज्योतीचे आगमन व स्वागत, मुख्य बाजारपेठेतून भव्य मिरवणुकीसह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुतळ्याला जल-दुग्धाभिषेक, नगरपालिका प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण आणि अभिवादन, गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि इतिहास प्रसारासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांचा सत्कार. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित "शिवाजी कोण होता" या पुस्तकांच्या 25 हजार प्रतींचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत बस स्टॅन्डजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा परिसरात भव्य-दिव्य असा विद्युत रोषणाईचा स्टॅंडिंग लाईट लेझर शो असे कार्यक्रम होणार आहेत.


ईडीच्या छापेमारीने मुश्रीफ अडचणीत 


नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ED Raid) यांच्या मागे ईडीचा ससेमीरा लागला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर दोनदा हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पहिल्यांदा त्यांच्या निवासस्थानी छापेमारी झाल्यानंतर दुसऱ्यांदा ते अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्यालय (KDCC ED Raid) कागल तालुक्यातील सेनापती कापशी तसेच गडहिंग्लज तालुक्यातील हरळी शाखेत ईडीने छापेमारी केली होती. यानंतर बँकेच्या पाच अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले होते. तब्बल 70 तासांनी त्यांची ईडीकडून सुटका झाली होती.


मुश्रीफांनी किरीट सोमय्यांचे आरोप फेटाळले 


कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून बदनामीसाठी षडयंत्र सुरु असल्याचे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. व्यक्तिगत आरोप करा, शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करु नका. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन. हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र सुरु आहे. केवळ आरोपापोटी छापे घालण्याचे हे जागतिक रेकॉर्ड होईल, असेही त्यांनी म्हटले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या