Ajit Pawar In Kolhapur : मोठ्या साहेबांनी अनेकदा के पी पाटील आणि ए वाय पाटील यांना एकत्र बसवलं, मुश्रीफ यांनी प्रयत्न केले, मी देखील काही सल्ले दिले. के पी यापुढे भावकी, म्हेहुणे पावणे हे वाद लवकरात लवकर सोडवा, राजकारणात बेरजेचे राजकारण करायचं असतं, असा सल्ला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेहुणे पाहुणे वादावर चिमटे काढले. माजी आमदार केपी पाटील यांनी पुन्हा घरवापसी करताना राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. केपी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मशाल हाती घेतली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रवादीत घरोबा केला आहे. अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा प्रक्षप्रवेश पार पडला. यावेळी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठा भाऊ परत मिळाल्याची भावना व्यक्त करताना केपी आणि एवाय पाटलांना पक्षातून सोडणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. यानंतर दोघांमधील वादाचा संदर्भ देत अजित पवार यांनीही चिमटे काढत सल्ला दिला. विधानसभा निवडणुकीत एवाय पाटील यांनीही अपक्ष निवडणूक लढवली होती. 

Continues below advertisement


तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या कामाला लागा


राजकारण जरूर करावं मात्र विकास कामात कोणतीही अडचण आणू नये. असं जर कोण करत असेल तर तो माझ्या विचाराचा नाही. कारखान्याच्या डिसलरी प्रकल्पाला परवानगी द्यायचं माझ्याच हातात असल्याचे म्हणाले.  मुश्रीफ साहेब जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, महापौर सगळ्या ठिकाणी जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवे आहेत. भुजबळसाहेब झाले मंत्री, हसन मुश्रीफ झाले मंत्री पण कार्यकर्त्यांनी काय करायचं, नेतृत्व तयार झाले पाहिजे, लोकसभेला, विधानसभेला काय करायचं ते करू पण तोंडावर आलेल्या निवडणुकीच्या कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले. 



तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ


अजित पवार म्हणाले की, के पी पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोल्हापुरातील चेहरा म्हणून ओळखला तो म्हणजे के पी पाटील. के पी पाटील यांनी कितीही मशाली पेटवल्या तरी त्यांच्या हृदयात कायम घड्याळ राहिलं आहे. घरातला माणूस काही दिवस घराबाहेर राहिला, पण हा माणूस पुन्हा घरात आला की जो आनंद होतो तसाच आनंद आज झाला असल्याचे ते म्हणाले. सुबह का भूला शाम को घर आया असंच म्हणावं लागेल, के पी तुमचा स्वभाव पाहता तुम्ही राजकारणाच्या बाहेर जाऊ शकत नाही, असे अजित पवार म्हणाले. 


तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो


त्यांनी पुढे सांगितले की, राज्यातील 200 साखर कारखान्यात सर्वात जास्त दर कोण देत असेल तर तो बिद्री साखर कारखाना आहे. राधानगरी-भुदरगड मतदारसंघाला के पी तुमची गरज आहे. आपण एकमेकांत भांडत बसलो तर त्याचा फायदा दुसऱ्याला होतो. या वादाचा फटका तुम्हाला, पक्षाला बसत असतो. मला कुणावर टीका करायची नाही पण भोगावती, कुंभी, आजरा साखर कारखान्याची आज अवस्था काय आहे अशी विचारणा त्यांनी केली. नेतृत्व चांगलं नसेल, तर संस्थांची काय अवस्था होते हे पहा. आज के पी यांनी राज्यात एक नंबर कारखाना चालवला आहे. के पी पाटील हे शरद पवार साहेबांच्या तालमीत तयार झाले आहेत. गोकुळ चांगल्या पद्धतीने चालतो त्याचे श्रेय हसन मुश्रीफ आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातं, शरद पवार साहेबांनी नेहमी बेरजेचं राजकारण केलं असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या