Rajaram Sakhar Karkhana : कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी होत आहे. या सभेसाठी रणनीतीचा भाग म्हणून विरोधकांची बैठक पार पडली. काल विरोधकांच्या बैठकीत आमदार सतेज पाटील यांनी शड्डू ठोकताना अमल महाडिक यांच्यावर हल्लाबोल केला. ‘राजाराम’ची सभा महाडिकांची शेवटची असल्याचे आमदार सतेज पाटील म्हणाले. 


30 सप्टेंबर रोजी होणार्‍या राजाराम कारखाना वार्षिक सभेच्या पूर्वतयारीसाठी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. 


सतेज पाटील म्हणाले की, शुक्रवारची सभा माजी आमदार महादेवराव महाडिक व त्यांच्या संचालकांची शेवटची सभा असेल. ही सभा व्यवस्थित पार पाडून परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहूया. राजाराम कारखान्याचे 1346 सभासद न्यायालयाने अपात्र ठरविले. परिवर्तनाची पहिली लढाई आपण जिंकलो आहोत. त्यामुळे राजाराम कारखान्याच्या आगामी निवडणुकीसाठी सभासदांनी सज्ज राहावे. 


अमल महाडिक यांच्यावर हल्लाबोल


यावेळी सतेज पाटील राजाराम कारखान्याच्या 7/12 वर अमल महाडिक याचे नाव लावायचे नसेल, तर परिवर्तन घडवूया असे सांगत हल्लाबोल केला. सभेत महाडिक गटाकडून गोंधळ घालण्याची रणनीती सुरू आहे, आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत. परिवर्तन आघाडीकडून ठरलेल्या सभासदांनीच प्रश्न विचारावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.  


सभेमध्ये बाहेरील लोक आणून जर सामान्य सभासदांना त्रास दिलात, तर जशास तसे उत्तर देऊ. सभा झाल्यावर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल, असा इशाराही पाटील यांनी दिला.