Helmets Compulsory in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. कोल्हापूर आरटीओ विभागाकडून आतापर्यंत जिल्ह्यात 1 हजार जणांकडून 10 लाख रुपये दंड वसूली करण्यात आली आहे. कोल्हापूमध्ये 22 मे रोजी हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आल्यानंतर तातडीने कारवाई न करता जनजागृती करण्यात आली होती. तसेच यासदंर्भात खासगी, सरकारी आस्थापना तसेच महाविद्यालयांना नोटीसा पाठवण्यात आल्या होत्या.
1 हजार जणांकडून 10 लाख रुपये दंड वसूल
या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापुरात हेल्मेट सक्तीनंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांबाहेर आरटीओ विभागाकडून कारवाईची मोहीम सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात आता दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट नसल्यास तर आता 1 हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे. आरटीओ विभागाकडून 1 हजार वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या 1 हजार जणांकडून10 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती आरटीओचे दीपक पाटील यांनी दिली आहे. विना हेल्मेट गाडी चालवणारा चालक आणि ज्याच्या नावावर गाडी आहे त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
एमआयडीसी कामगारांवर कारवाई सुरु
आरटीओ विभागाकडून एमआयडीसीमधील अनेक कामगारांवर शनिवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात आली आहे. आरटीओ विभाग एमआयडीसीमध्ये व्यापक मोहीम राबवणार आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी आपल्या कामगारांना हेल्मेट वापरण्याबाबत सूचना करण्याबाबत पुन्हा सूचना देण्यात आल्या आहेत. सुरुवातीला आस्थापना/कंपन्यांच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर येणाऱ्या प्रत्येक वाहनधारकाकडे हेल्मेट आहे का? याची तपासणी सुरू आहे.
जिल्ह्यात सोमवारी 22 मेपासून हेल्मेट सक्ती लागू झाली आहे. दुचाकीस्वार ज्या संस्थेत, कार्यालयात, कंपनीत काम करतो त्या मालकासही होणार 1000 रुपये दंड करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायदा, 1988 मधील कलम 194 ड मधील तरतुदीनुसार हेल्मेट वापरासंबंधी तरतुदींचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. तसेच ज्या आस्थापना आहेत किंवा त्यांचे कार्यालय प्रमुख आहेत त्यांनाही 1 हजार रुपये दंडाची तरतूद आहे. पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी आस्थापना आणि महाविद्यालये असे तीन विभाग घेतले आहेत. या सर्वांना नोटीस पाठवल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरात एकूण रस्ते अपघातामध्ये 70 ते 80 टक्के अपघात दुचाकी आणि पादचाऱ्यांचे आहेत. रस्ते सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अतिशय चिंताजनक बाब आहे.
वाहन चालविताना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनाच्या अपघातांमध्ये जखमी अथवा मृत वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे आहेत. त्यामुळे हेल्मेटसाठी व्यापक मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :