Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली येथे 2011 साली झालेल्या ऊस आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 80 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री. कश्यप यांच्या कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 16 वर्षानंतर हा निकाल लागल्याने आंदोलनातील शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकाला गळाभेट घेत आनंद व्यक्त केला.
पोलिस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक गुन्हा
यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की शेतकरी आंदोलने करत असताना आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलिस प्रशासनास हाताशी धरून जाणीवपूर्वक हा गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याने चळवळीमध्ये लढण्यासाठी कार्यकर्त्यांना पुन्हा बारा हत्तीचे बळ आले आहे. शेतकरी हा न्याय हक्कासाठी व घामाच्या दामासाठी संघर्ष करत होता आणि तो यापुढेही लढतच राहणार असल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
शिरोलीत झालेल्या घटनेनंतर सुरवातीस वडगांव न्यायालयात कामकाज चालले. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाकडे सदर प्रकरण वर्ग करण्यात आले. गेली 15 वर्षे या आंदोलनातील आरोपी असलेले सर्व शेतकरी कार्यकर्ते न्यायालयाच्या पायऱ्या झिजवत होते. प्रदीर्घ वर्षानंतर सर्व आंदोलकांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणी ॲड.ब्रिजेश शास्त्री, ॲड. श्रेणिक पाटील, ॲड. अमेय मकरे, ॲड, सुवर्णभद्र पाटील, ॲड. टी वाय जाधव, ॲड. प्रिती चिटणीस, ॲड. ऋषिकेश काकडे, ॲड. ऋषिकेश शास्त्री, ॲड. व्ही व्ही डोईजड यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
इतर महत्वाच्या बातम्या