Kolhapur News: कोल्हापूर शहरात एका कुटुंबांने नियमबाह्यपणे पाळलेली मांजरे जप्त करण्यात आली. रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले यांच्या घरी असलेल्या मांजरांवर ही कारवाई झाली. कारवाईवेळी एका मांजराने मनपा कर्मचाऱ्याच्या हाताचा चावा देखील घेतला. मांजरांना खाऊ घातलेले पदार्थ आणि इतर कचरा साचल्यामुळे आयरेकर कॉलनीतील रहिवाशी त्रस्त होते. पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये तीन मांजरे जप्त करण्यात आली. उर्वरित दहा ते बारा मांजरे पळून गेली. मात्र, मांजरामुळेच आणि इतर असा एकूण दोन ट्रॉल्या कचरा बुलबुले यांच्या घरातून कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.

Continues below advertisement

रंकाळा स्टॅन्ड परिसरातील आयरेकर गल्लीतील बुलबुले कुटुंबाने ही मांजरे पाळली होती. घरात मांजरांना रोज घातलेल्या खाद्याचे अवशेष, मल, मूत्र, घरगुती कचरा अनेक दिवसांपासून घरात साचलेला होता. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली. याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत होता. आयरेकर गल्लीतील रहिवाशांनी याबाबतची तक्रार पोलिसांकडे केली. तक्रार आल्यानंतर महानगरपालिकेने बुलबुले यांना दोन नोटीसही दिल्या होत्या. मात्र, त्यांनी स्वच्छता ठेवली नाही. त्यामुळे ही कारवाई झाली.

बुलबुले यांच्या घरात जवळपास 40 ते 45 मांजरे 

काही दिवसांपूर्वी बुलबुले यांच्या घरात जवळपास 40 ते 45 मांजरे होती. कालांतराने मांजरी कमी झाली. कारवाई वेळी जवळपास 35 मांजरे या घरात होती.महानगरपालिकेचे पथक कारवाई करायला आल्यानंतर त्यांना विरोध झाला. मात्र स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कारवाई करत यातील तीन मांजरे जप्त केली. जप्त केलेली तीन मांजरे महापालिकेच्या कुत्रे निर्बीजीकरण केंद्रात ठेवण्यात आली आहेत. बुलबुले कुटुंबाने सर्व नियम पाळून मांजरे पाळण्याची हमी दिली तर जप्त तीन मांजरे त्यांना परत करण्यात येणार आहेत. 

Continues below advertisement

मांजरे पळून गेल्याने जप्त करता आली नाहीत

बुधवारी सकाळी पथक घरात पोहोचले. घरात जाऊन कचरा भरताना, मांजरे पकडताना विरोध झाला. यामुले कर्मचारी आणि बुलबुले कुटुंबीय यांच्यात वाद झाला. त्यातूनही तीन मांजरे पकडून ती जप्त केली. उर्वरित मांजरे पळून गेल्याने जप्त करता आली नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक स्वप्निल उलपे, नंदकुमार पाटील, दिलीप पाटणकर, सूरज घुणकीकर यांच्या पथकाने कारवाई केली.

इतर महत्वाच्या बातम्या