Shivaji University: कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात 247 नवे अभ्यासक्रम सुरु होणार आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत नव्या अभ्यासक्रमास मंजूरी देण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली शाहू सभागृहात अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली. कुलगुरु डॉ. शिर्के यांनी माहिती देताना सांगितले की, आटपाडी, राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्याच्या ठिकाणी नव्याने सॅटेलाईट सेंटर सुरू करण्यात येतील. चित्रपट, नाटक, इतर कला, संगीत यांचा समावेश असलेले स्कूल ऑफ फाईन आर्टस येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा मानस आहे. ललित कला महाविद्यालयाचाही बिंदू या आराखड्यात आहे. आराखडा पुढील कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. 


कोणत्या अभ्यासक्रमांचा समावेश असणार?


शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित अभ्यासक्रमामध्ये जिल्हा स्तरावर लोककला महाविद्यालय, पदव्युत्तर डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, शारिरीक शिक्षण महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ हार्टिकल्चर अन्ड स्पायसेस, शुगर इन्स्टिट्यूट, तालुकास्तरावर क्रीडा, विधी, एकात्मिक शिक्षणशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय, कला, वाणिज्य, विज्ञान रात्र महाविदयालये व कौशल्यावर आधारित 247 नव्या अभ्यासक्रमांचा पाच वर्षांच्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या बैठकीत विद्यापीठाचा आगामी पाच वर्षांचा सुधारित बृहत आराखडा अधिसभेच्या विशेष बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. याच बैठकीत 10 मार्चला झालेल्या अधिसभेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत कायम करण्यात आला. सन 2021/22 या शैक्षणिक वर्षातील 59 वा मराठी वार्षिक अहवाल मंजूर करण्यात आला आहे. 


यावेळी अधिसभेसमोर प्रकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी यापूर्वी झालेल्या बैठकीतील वृतांत व विषयनिहाय झालेल्या चर्चेतील मुद्दे मांडले. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस.पाटील यांनी बृहत आराखडा सभागृहासमोर सादर केला. त्यात त्यांनी संबंधित आराखडा तयार करण्यासाठी राबविलेली प्रक्रिया, नवीन अभ्यासक्रम, विद्याशाखा, महाविद्यालये आदींची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या चर्चेत अधिसभा सभागृहाने व्यवस्थापन परिषदेच्या सुधारित शिफारशीनुसार विद्यापरिषदेची सुधारित शिफारस विचारार्थ घेउन या पंचवार्षिक बृहत आराखड्यास मान्यता देण्यात आली.


शिवाजी विद्यापीठातील संशोधनाला भारतीय पेटंट


दरम्यान, सुगंधी वनस्पतींमधील तेलाचे प्रमाण मोजण्यासाठी विशेष पोर्टेबल उपकरणाची निर्मिती करण्यात शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. या संशोधनाला अलीकडेच भारतीय पेटंट मिळाले आहे. शिवाजी विद्यापीठातील प्राध्यापक व सध्या डॉ. होमी भाभा समूह विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांच्यासह सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुकाराम डोंगळे, डॉ.गणेश निगवेकर, डॉ. क्रांतिवीर मोरे आणि डॉ. मानसिंगराज निंबाळकर यांचा या संशोधन कार्यामध्ये समावेश आहे. सुगंधी वनस्पतींमधील तेल सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी निर्माण केलेल्या उपकरणासाठी हे पेटंट मिळाले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या