Kolhapur Crime : रेल्वे खात्यात, आयकर विभागात भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो असे आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे देवून 24 युवकांची 1 कोटी,43 लाखाची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपुर गल्ली, कुरूंदवाड) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे. याप्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा.फुलेवाडी, ता.करवीर, जि.कोल्हापुर), मोहम्मद कामील अब्दुल गफार (वय41, सध्या रा. कुर्ला मंबई, मुळ रा. प्लॉट नं. 14 नुरी मशिदजवळ जाफर नगर, नागपूर), अनिस खान गुलाम रसुलखान (वय 46 रा.137 काटोल रोड, गोटिक खान (कटोलोड) नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. प्लॉट नं. 8 साल्ट लाखे बायपास, एल बी चौक सेक्टर 3 कोलकाता),सुबोधकुमार (रा.पश्चिम राजबटी मध्याग्राम दक्षिण 24 परगनास, कोलकाता) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur Crime)
विविध ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून दाम दुपटीच्या अमिषापोटी अनेकांची फसवणूक झाली हे प्रकरण ताजे असतानाच आता नोकर भरतीचे आमिष दाखवून एका महिलेसह 5 भामट्यांनी चक्क कोल्हापूर जिल्ह्यातील युवक व पालकांना 1 कोटी,43 लाखाला गंडा घातल्याचा प्रकार कुरुंदवाड शहरात पुढे आला आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्या युवकांनी भामट्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर पैसे पाठवले आहेत. यासर्व बँकेच्या नोंदी तक्रारी सोबत सादर केल्या आहेत. आयकर विभागातून माहिती घेण्यात आली आहे. ही फसवणूक झाली असून आर्थिक गुन्हे अन्वेषणने केलेल्या पडताळणी आणि जिल्हा पोलिस प्रमुख शैलेंश बलकवडे यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सपोनि बालाजी भांगे यांनी दिली.
फिर्यादी आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग, दिल्ली येथे तर दुसऱ्या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख रुपये घेतले आहेत. करडे व त्यांच्या सहकाऱ्यांना आर्मीत 35 मुलांची बॅच पाठवायची आहेत, आणखी मुले असतील तर घेऊन या असे आमिष दाखवल्याने जिल्ह्यातील गडहिंग्लज,आजरा,कोल्हापूर, इचलकरंजी,शिरोळ कुरुंदवाड येथील 24 युवकांच्या पालकांनी सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये यांनी सांगितलेल्या खात्यावर जमा केले.
या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिंगसाठी कोलकाता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रकांच्यावर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल असे सांगून लावून दिले. पालकांचा सुबोध कुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र, 25 जुलै 2022 पासून सुबोधकुमारचा फोन बंद आहे. त्याच्याशी आजतागायत पालकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे पुढे आल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या