Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (Gokul Dudh Sangh Kolhapur) अर्थात गोकुळची 63वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना या ठिकाणी पार पडत आहे. 'गोकुळ'च्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान या सभेत गोंधळ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशातच गोकुळने या सभेत एक मोठा निर्णय घेतला आहे. आता बाजारात गोकुळ आइसक्रीम आणणार असल्याची घोषणा नविद मुश्रीफ (Navid Mushrif)यांनी केली आहे. यासह चीज आणि आईस्क्रीम हे दोन नवे प्रॉडक्ट गोकुळ आणणार असल्याचे बोललं जात आहे. आजच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत गोकुळनं हा मोठा निर्णय घेतला आहे.
शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती, पण...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात 'गोकुळ'च्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेत गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'गोकुळ'च्या संचालिका शौमिका महाडिक यांनी व्यासपीठावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत त्या व्यासपीठावर बसणार नाहीत, अशी त्यांची भूमिका आहे. सध्याचे गोकुळ अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी शौमिका महाडिक यांना व्यासपीठावर बसण्याची विनंती केली आहे, कारण त्या महायुतीच्या संचालिका आहेत. मात्र, शौमिका महाडिक त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत.
.......तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही
"माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी व्यासपीठावर जाणार नाही," असे त्यांनी म्हटले आहे. 'महायुती'च्या आमदारांचे आणि खासदारांचे फोटो नसल्याबद्दलही त्यांनी खंत व्यक्त केली आहे. 'गोकुळ'च्या सर्वसाधारण सभांमध्ये यापूर्वीही गोंधळ झाला आहे. 30 सप्टेंबर 2018 रोजी सत्ताधाऱ्यांवर चुकीच्या कारभाराचा आरोप करत राडा झाला होता. 30 ऑगस्ट 2019 रोजी खुर्च्या बांधून ठेवण्याची वेळ आली होती. 29 ऑगस्ट 2022 रोजी सभेची जागा बदलण्यावरून गोंधळ झाला. 15 सप्टेंबर 2023 रोजी 'शौमिका महाडिक' यांनी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारले होते. 30 ऑगस्ट 2024 रोजी 'शौमिका महाडिक' यांच्यासोबतच्या सभासदांनी बॅरिकेड तोडून प्रवेश केला होता. यामुळे यंदाही सभेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.
गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यानंतर सर्वसाधारण सभेच्या दरम्यान शौमिका महाडिक यांची बसण्याची व्यवस्था व्यासपीठाच्या अगदी एका बाजूला केलेली असायची. मात्र यावेळी महायुतीचा चेअरमन झाला आणि शौमिका महाडिक यांची बसण्याची व्यवस्था थेट व्यासपीठाच्या मध्यभागी करण्यात आली. गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या बाजूला माजी चेअरमन विश्वास पाटील आणि अगदी त्यांच्याच बाजूला शौमिका महाडिक यांची बसण्याची व्यवस्था केली. याचाच अर्थ गेले 4वर्षे व्यासपीठाच्या एका बाजूला शौमिका महाडिक यांची केलेली बसण्याची व्यवस्था आता थेट मध्यभागी केली आहे.