Kiran Mane Social Media Post : सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. तर, दुसरीकडे राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग-आउटगोईंगदेखील सुरू झाले आहे. वेगवेगळ्या राजकीय मुद्देदेखील चर्चेत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याच दरम्यान आता, अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी भाजप कार्यकर्त्यांवर बोचरी टीका केली आहे. शिवसेनेचं कुंकू-राष्ट्रवादीचं मंगळसूत्र-काँग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था "सतरा नवरे... एकीला न आवरे !" अशी झाली असल्याचे टीका किरण माने यांनी केली. 


यंदाची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा चंगच भाजपने बांधला आहे. त्यामुळे काश्मीर ते राम मंदिराचा मुद्दा भाजपने चर्चेत आणला आहे. तर, दुसरीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्ष फोडले असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यावरच किरण माने यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये भाष्य केले आहे.


अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर विविध मुद्यांवर भाष्य करतात. किरण माने यांनी भाजप कार्यकर्त्यांना आपल्या खास शैलीत डिवचले. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये किरण माने यांनी म्हटले की, थोडक्यात काश्मीरपास्नं मंदिरापर्यन्त आदळआपट करूनबी जनसामान्यांच्या मनात स्थान न मिळवल्यामुळं, शिवसेनेचं कुंकू-राष्ट्रवादीचं मंगळसूत्र-काॅंग्रेसची जोडवी घालायची नामुष्की आलेल्या भाजपाची अवस्था, "सतरा नवरे... एकीला न आवरे !" अशी झालीय... आन् भाजपाच्या कार्यकर्त्यांची अवस्था? आरारारारा... "सतरा लुगडी तरीबी म्या उघडी !  असा बोचरा वार केला आहे.



किरण माने यांना अनेकदा त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांकडून ट्रोलही केले जाते. त्यानंतर ही किरण माने यांच्याकडून सोशल मीडियावर पोस्ट केल्या जातात. 


शरद पवारांचे केले कौतुक


 किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली होती. शरद पवारांच्या एका सभेतील व्हिडिओ किरण माने यांनी शेअर करत ही पोस्ट लिहिली. शरद पवारांच्या एका सभेत जनतेमधून एक कार्यकर्ता आवाज देतो, त्या कार्यकर्त्याचं नाव शरद पवार ओळखतात. त्याचाच हा व्हिडिओ आहे. या पोस्टमधून किरण माने यांनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. 


किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटले?


नुस्त्या आवाजावरनं पवारसाहेबांनी कार्यकर्त्याचं नांव ओळखलं ! ते अचूक निघालं !! काय अजब रसायन आहे राव हे... त्र्याऐंशी पेक्षा जास्त वय असलेल्या माणसाला जवळच्या नातेवाईकांची नांवं आठवत नाहीत गड्याहो... अद्भूत स्मरणशक्ती... अफलातून उत्साह... तुम्ही पवारविरोधक किंवा द्वेष्टे असा, तुम्हाला या माणसाच्या या गोष्टींचीही तारीफ करता येत नसेल तर तुमची जिंदगी झंड आहे. आयुष्य नफरतीने चडफडत काढणार तुम्ही, असं म्हणत किरण माने यांनी विरोधकांना देखील टोला लगावला आहे.