बंगळुरु: कर्नाटक काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री (Karnataka CM) बदलाची चर्चा सुरू आहे. त्यावरुन आता सिद्धारमय्या आणि डी. के. शिवकुमार गटांमध्ये जोरदार ओढाताण सुरू असल्याचं चित्र आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) आणि मुख्यमंत्री सिद्धारमय्या (Siddaramaiah) यांच्या गटातील आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. दरम्यान, डी. के. शिवकुमार हे बंगळुरु विमानतळावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांच्या कारमध्ये दिसल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
Kharge–Shivakumar Meeting : खरगे–शिवकुमार भेटीने राजकीय समीकरणे बदलली
मंगळवारी सकाळी डीके शिवकुमार हे बंगळुरु इंटरनॅशनल एअरपोर्टवर खरगे यांच्या कारमध्ये दिसले. हा क्षण कॅमेऱ्यात कैद होताच काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत दोघांमध्ये किमान 45 मिनिटांचा वन-ऑन-वन (One-on-One Meeting) संवाद झाला असण्याची शक्यता आहे.
खरगे दिल्लीला रवाना झाले असून, तिथे ते कर्नाटकातील सुरू असलेल्या राजकीय स्थितीबाबत लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा करणार आहेत.
DK Shivakumar Reaction : गरज पडली तर खरगेंची भेट घेणार
डीके शिवकुमार यांनी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत बराच वेळ चर्चा केल्यानंतर माध्यमांनी त्यांना गाठलं. राष्ट्रीय अध्यक्षांबरोबर नेमकी काय चर्चा झाली असा प्रश्न माध्यमांनी विचारला. तसेच खरगे यांच्याशी आधी दिल्लीमध्ये भेट आणि आता पुन्हा भेट यामागचे राजकारण काय असाही प्रश्न विचारण्यात आला. डीके शिवकुमार म्हणाले की, मी खरगे यांना वारंवार भेटत नाही. गरज पडली तर त्यांची वेळ घेऊन मी त्यांची भेट घेईन.
एअरपोर्टवरील उपस्थिती हा फक्त शिष्टाचार दौरा असल्याचा दावा डीके शिवकुमार यांनी केला; तरीही राजकीय वर्तुळात त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
Siddaramaiah On Karnataka CM : हायकमांडची इच्छा असेपर्यंत...
काही झाले तरी पाच वर्षे पूर्ण आपणच मुख्यमंत्री राहणार असा दावा सिद्धारमय्या यांनी केला होता. त्यांनंतर आता त्यांचा सूर काहीसा मवाळ झाल्याचं दिसतंय. हायकमांडची इच्छा असेल तोपर्यंत आपण मुख्यमंत्रिपदावर राहू असं सिद्धारमय्या म्हणाले. सिद्धारमय्या यांचा बदललेला सूर हा डीके शिवकुमार यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.
Karnataka Congress : कर्नाटकात काय होणार?
दिल्लीमध्ये खरगे आणि राहुल गांधी यांच्यातील भेटीनंतर कर्नाटक काँग्रेसमधील पुढील राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे. सत्ता संतुलन, मंत्रिमंडळ फेरबदल, किंवा मुख्यमंत्रीपदाचा बदल, तिन्ही पर्यायांवर सध्या गंभीर चर्चा सुरू आहे.