बेंरलुरू: मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून जबर दंड वसूल करणाऱ्या कर्नाटक सरकारने आता दंडाची रक्कम आता कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने बुधवारी ही दंडाची रक्कम 1000 रुपयांवरून 250 इतकी केली तर ग्रामीण भागात ती 500 रुपयांवरून 100 रुपये इतकी केली आहे. या आधीच्या दंडाच्या रक्कमेवरून आणि सार्वजनिक ठिकाणी दंडाची रक्कम वसुल करताना पोलिसांची दांडगाई यावरून शासनाला विविध स्तरातून टीकेला सामोरे जावे लागले होते.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा पत्रकार परिषदेला संबोधीत करताना म्हणाले की, शासनाने मास्क न वापरणाऱ्यांसाठी दंडाची रक्कम शहरी भागात 1000 रुपये तर ग्रामीण भागात 500 रूपये इतकी ठरवली होती. यावर लोकांच्या नाराजीमुळे आणि तज्ञांच्या सल्ल्याने ही रक्कम कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही नविन दंडाची रक्कम आता शहरी भागासीठी 250 रुपये तर ग्रामीण भागासाठी 100 रुपये इतकी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी असेही सांगितले की कोरोनाचा उद्रेक जेंव्हापासून झाला आहे तेंव्हापासून कर्नाटक शासनाने लॉकडाऊन, मास्क वापरण्याचे बंधन आणि सॅनिटायझरचा वापर यासोबच इतर अनेक उपाययोजना केल्या आहेत. कोरोनावर अजूनही लस शोधायला कोणालाही यश आले नाही. भारतातही अशी लस उपलब्ध नाही. त्यामुळे मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टनसिंग हेच कोरोनावरील नियंत्रणाचे मार्ग आहेत.
राज्य सरकारने 1 ऑक्टोंबरपासून राज्यातील व्यवहार परिणामकारकरित्या सुरळीत चालण्यासाठी नवे नियम तयार केले आहेत. सार्वजनिक आणि कामाच्या ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक करणे हा त्याचाच एक भाग आहे.
भारतात कोरोना रुग्णांची संख्या 67.57 लाख इतकी झाली आहे. तर 57,44,693 लोक या आजारातून बरे झाले आहेत. हा दर 85.02 इतका आहे. तसेच मृतांची संख्य़ा 1,04,555 इतकी झाली आहे.
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या ही 6,57,705 इतकी झाली आहे. यापैकी 1,15,151 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण 5,33,074 इतके लोक कोरोनामुक्त झाले असुन 9461 रुग्ण मृत पावले आहेत.

देशभरात आणि कर्नाटक राज्यात सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने मास्क न वापरणाऱ्यां लोकांच्या दंडाची रक्कम कमी केल्याने लोकांचा निष्काळजीपणा वाढेल आणि कोरोनावर नियंत्रण करणे अवघड होईल अशी चिंता काहीजनांकडुन व्यक्त केली जात आहे