Bhuvan Badyakar : काही दिवसांपूर्वी 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून या गाण्यामुळे भुवन बडायकर (Bhuvan Badyakar) चांगलाच लोकप्रिय झाला. आता भुवन बडायकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भुवनने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं आहे. भुवन आता प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सज्ज झाला आहे.
भुवनचे 'होबे नाकी बौ' हे गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अवघ्या दोन दिवसांत 1.4 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या गाण्याला केशब डे आणि भिवन यांनी आवाज दिला आहे. या गाण्याचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'कच्चा बदाम' गाण्याचा इतिहास काय आहे?
भुवन बडायकर शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असे म्हणायचा. भुवन बडायकर असे या शेंगदाणा विक्रेत्याचे नाव आहे. भुवन बडायकर हे पश्चिम बंगालमधील कुरलजुरी या गावचे रहिवासी आहेत. पश्चिम बंगालमध्ये बदामाला 'कच्चा बदाम' म्हणतात. भुवन शेंगदाणे विकताना 'बदाम... बदाम... कच्चा बदाम' असं त्याच्या शैलीमध्ये गायचा. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अनेकांनी यावर रिल्स आणि व्हिडीओही बनवले. त्यानंतर या गाण्याचं आता रॅप वर्जनमध्ये गाणं आलं आहे. तेही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे.
भुवन एकेकाळी शेंगदाणे विकत गावोगावी फिरत असे. पण 'कच्चा बदाम' या गाण्याने भुवनला लोकप्रियता मिळाली. तसेच त्याला अनेक ऑफर्सदेखील मिळत आहेत. 50 वर्षांच्या भुवनची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इन्स्टाग्रामवर अनेकांनी 'कच्चा बदाम' गाण्यावर रील्स बनवल्या आहेत. यात अनेक सेलिब्रिटींचादेखील समावेश आहे.
संबंधित बातम्या