नागपूर : नागपूर महानगर व जिल्ह्यातील खाजगी दवाखाने, हॉटेल्स, पेट्रोल पंप, मॉल्स, शैक्षणिक संस्था, लॉन्स सिनेमागृह यासारख्या सर्व खाजगी आस्थापनांचे महत्वपूर्ण प्रशिक्षण 23 जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला स्वतः या प्रशिक्षणाला उपस्थित राहणार असून सर्व खाजगी आस्थापनांनी उपस्थित राहण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील खाजगी आस्थापनांनी आपल्या आस्थापनाची संपूर्ण माहिती वेळोवेळी अद्यावत करणे आवश्यक आहे. सेवायोजन कार्यालय, रिक्तपदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा कायदा 1959 नियमावली 1960 अनुसार ही माहिती अद्यावत करणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वेबसाईटवर अपलोड करणे, प्रत्येक आस्थापनाला अनिवार्य आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतेक आस्थापनांनी ही माहिती अपलोड केली नाही. ही माहिती कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची, याबाबतचे प्रशिक्षण जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 23 जून रोजी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये नेमकी माहिती कशी भरायची, कोणती माहिती भरायची, कशासाठी भरायची, याचे फायदे काय आहेत. याबाबतचे मार्गदर्शन तज्ञ करणार आहे. स्वतः जिल्हाधिकारी आर. विमला तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त प्र. ग. हरडे या कार्यशाळेला उपस्थित राहणार असून सर्व आस्थापनांनी यासंदर्भात नोंद घेण्याचे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.


अनुपस्थितांवर कठोर कारवाई


कौशल्य विभागामार्फत ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे, आस्थापनेची संपूर्ण माहिती वेळोवेळी अद्ययावत करणे, त्रैमासिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने भरणे. तसेच रिक्त पदे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची प्रक्रिया पार पाडणे, त्यासाठी राज्य शासनाने विहित केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करणे, बंधनकारक आहे. मात्र असे निर्देशास आले की, याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाला क्षेत्रनिहाय कार्यरत मनुष्यबळाची माहिती योग्य प्रमाणात सादर करण्यात अडचणी निर्माण होत आहे. केंद्र शासनाने व राज्य शासनाने यासंदर्भात कडक कारवाईचे निर्देश दिले. जिल्ह्यातील आस्थापनांची योग्य माहिती अद्यावत करण्याबाबतचे आदेश आहे. त्यानुसार हे प्रशिक्षण घेतले जात आहेत. या प्रशिक्षणाला सर्वांनी उपस्थित राहावे, अनुपस्थित राहणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.