Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला (Pahalgam Terror Attack) केला. या हल्ल्यात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी घटनास्थळाची पाहणी केली. अमित शाहांकडून बैसरन व्हॅलीची पाहणी करण्यात आली. पहलगाम येथे नेमकी घटना कशी घडली, याबाबत अमित शाह यांनी माहिती घेतली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपालही यावेळी अमित शाहांसोबत उपस्थित होते. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर दुपारी अमित शाह दिल्लीकडे रवाना होणार आहेत. यानंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार आहेत. दिल्लीत एक महत्वाची बैठक घेण्यात असून यावेळी भारताचं पुढचं पाऊल काय असेल?, कोणती कारवाई करण्यात येणार यावर बैठकीत चर्चा होईल. 

अमित शाह यांनी घटनास्थळी पोहचण्याआधी जम्मू काश्मीर पोलीस कंट्रोल रूममधे मृतकांच्या पार्थिवाचं अंतिमदर्शन घेतलं. अमित शाह यांनी यावेळी मृतांच्या परिवाराचं सांत्वन केलं. यानंतर अमित शाह यांनी ट्विट करत दहशतवाद्यांना इशारा दिला आहे. अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली. तसेच भारत दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही, असं अमित शाह म्हणाले. तसेच या भ्याड दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही, असा इशारा देखील अमित शाह यांनी दिला. 

मृतकांच्या कुटुंबियांच्या आक्रोशापुढे अमित शाह स्तब्ध-

मृतकांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर अमित शाह यांनी बाजूला उभा असणाऱ्या मृतकांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. यावेळी कुटुंबियांनी आक्रोश केल्याचं पाहायला मिळालं. मृतकाच्या  कुटुंबियांच्या आक्रोशापुढे अमित शाह देखील स्तब्ध झाले. 

दिल्लीत घडामोडींना वेग-

पहलगाममधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर भारतीय सैन्यदलाला (Indian Army) अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारत आता पाकिस्तानावर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक करणार का, अशी चर्चा सुरु झाली आहे. काहीवेळापूर्वीच संरक्षण मंत्रालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापले सैन्य तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विशेषत: भारतीय वायूदल आणि नौदलाला अलर्ट मोडवर राहण्याचा आदेश मिळाला आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते का, याविषयी तर्कवितर्क बांधले जात आहेत. गेल्या काही तासांपासून दिल्लीत वेगवान घडामोडी सुरु आहेत. 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांची नावे

1) अतुल मोने - डोंबिवली2) संजय लेले - डोंबिवली३) हेमंत जोशी- डोंबिवली४)  संतोष जगदाळे- पुणे५)  कौस्तुभ गणबोटे- पुणे६)   दिलीप देसले- पनवेल

जखामींची नावे 1) एस बालचंद्रू2) सुबोध पाटील3) शोबीत पटेल

संबंधित बातमी:

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला 'ती' गोष्ट खटकली?; पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं टायमिंग ठरतंय चर्चेचा विषय, 5 महत्त्वाची कारणं

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: पतीला मारताचं पत्नी म्हणाली, मलाही मारुन टाका, दहशतवादी म्हणाला...; हृदय पिळवटून टाकणारा थरार