IPL 2025 DC vs LSG: राहुल पोरेल जोडीने काल दिल्लीच्या सहाव्या विजयाचा अभिषेक पूर्ण करून गुजरातसोबत गुणतालिकेत आघाडी घेतली. काल राजधानीचा लोको पायलट होता मुकेश कुमार..दिल्ली संघाच्या आजच्या विजयात मुकेश कुमार...आणि धावांचा पाठलाग करताना अभिषेक पोरेल ,राहुल आणि अक्षर यांची महत्वाची भूमिका ठरली..स्पर्धा मध्यंतर पार करून पुढे सरकत असताना प्रत्येक विजय महत्वाचा ठरत आहे...परवा गुजरात संघाने विजय मिळवून आपल्या खात्यात १२ गुण घेऊन प्ले ऑफ च्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकले...आणि काल दिल्ली संघाने सुद्धा एक पाऊल पुढे टाकले.
नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण स्वीकारून लखनौ संघाला फलंदाजीस आमंत्रित केले..पॉवर प्ले मध्ये बिनबाद ५१ आणि नंतर ८७ धावांची सलामी देऊन लखनौ संघाने चोख उत्तर दिले..त्यात मकरम चे खणखणीत अर्धशतक होते.दक्षिण आफ्रिकेचा हा खेळाडू आखूड चेंडूला लिलया सीमापार पाठवितो.त्याचा सहकारी मार्श ने ४५धावा केल्या पण त्यासाठी ३६ चेंडू घेतले.. ८७ धावांच्या सलामी नंतर लखनौ संघाने २३ धावत ४ बळी गमावले... पुरण जेव्हा लवकर बाद होतो तेव्हा तेव्हा लखनौ संघाची धावगती मधल्या षटकात मंदावते....आज देखील पुरण ने आल्या आल्या २ चौकार मारून छान सुरुवात केली होती..पण स्टार्कच्या कमी वेगात टाकलेल्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर तो त्रिफळाचित झाला...त्यानंतर मुकेश च्या एकाच षटकात समद आणि मार्श बाद झाल्यामुळे लखनौ संघ मागे पडला ...आज मुकेश ने यॉर्कर टाकून बळी मिळवून ... यॉर्कर या स्पर्धेत किती मोठे अस्त्र आहे हे दाखवून दिले.. आयुष बदोनी ने २१ चेंडूत ३६ धावांची आक्रमक खेळी केली पण ती खेळी धावफलकावर पुरेश्या धावा लावू शकली नाही..आज लखनौ संघाकडून फक्त ४ षटकार मारले गेले..आजच्या सामन्यात खटकणारी गोष्ट म्हणजे ऋषभ ने ७ व्या क्रमांकावर फलंदाजीस येणे...ऋषभ या स्पर्धेत कर्णधार म्हणून यशस्वी ठरत असला तरी तो एक फलंदाज म्हणून पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे...आत्मविश्वास गमावलेला नायक आपल्या संघाला प्रेरणा कशी देऊ शकेल..पुरण बाद झाल्यावर ऋषभ येणे अपेक्षित होते..पण तसे झाले नाही.
१६० धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्ली संघाने पहिल्याच षटकात १५ धावा करून आक्रमक सुरुवात केली...आल्या आल्या करुण नायर ने एक देखणा स्ट्रेंट ड्राईव्ह आणि एक दिमाखदार कव्हर ड्राईव्ह मारून तो काय टच मध्ये आहे हे दाखवून दिले...मकरम च्या गोलंदाजीवर एक सरळ षटकार खेचल्यानंतर दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्नात तो बाद झाला...तो बाद झाल्यावर आज अभिषेक पोरेल याने सुंदर फलंदाजी केली..दिल्ली चा हा डावखुरा फलंदाज दिल्ली संघाने लिलावात मध्ये रिटेन केलेला...या स्पर्धेत चांगल्या सुरुवातीनंतर तो बाद होत होता...पण आज त्याने आपल्या गुणवत्तेला न्याय दिला..त्याने चेंडू कट केले..ड्राईव्ह केले..रिव्हर्स स्वीप केले..आणि बिश्नोई ला मारलेल्या एका सरळ षटकार ने आपले अर्धशतक सजवले...त्याने राहुल सोबत महत्वपूर्ण ६९ धावांची भागीदारी केली ...त्याचे स्पर्धेतील हे पाहिले अर्धशतक..पोरेल बाद झाल्यावर डावाची सूत्रे अक्षर ने आपल्या हातात घेतली..२० चेंडूत ३४ धावा काढताना त्याने ४ टोलेजंग षटकार मारले..(संपूर्ण लखनौ संघाचे मिळून ४ षटकार होते).भारतीय संघात खेळत असताना अक्षर कायम एक अनसंग हिरो राहिला आहे...ज्या वेळी आपण २०/२० विश्वचषक जिंकलो त्या सामन्यात त्याची महत्त्वपूर्ण खेळी होती...आणि संपूर्ण स्पर्धेत त्याने त्याच्या अष्टपैलू खेळाची छाप पडली होती... काही अविश्वसनीय झेले घेतले होते...पण आपण कोणीच त्याच्याबद्दल फारशी चर्चा करीत नाही..
आज पुन्हा एकदा राहुल ४२ चेंडूत ५७ धावा काढून नाबाद राहिला..या खेळीत दिसला तो ठेहराव..तो दिल्ली संघात एका वडिलधाऱ्या माणसाची जबाबदारी पार पाडीत आहे हे दिसून येते..आज लखनौ या त्याच्या जुन्या संघाबरोबर विजय मिळविताना त्याने षटकार मारला..तो बहुतेक मैदानात उपस्थित असलेल्या गोयंका साहेबांसाठी होता...आज राहुल ने सुद्धा ठुकरा के मेरा प्यार हे गाणे मनातल्या मनात गायले असेल..अक्षर सोबत ३६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी करून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला..आज पहिल्या पर्वा नंतर आयुष म्हणाला की आम्हला १८० धावा करायला हव्या होत्या...पण अक्षर आणि राहुल ज्या पद्धतीने खेळले तेव्हा त्या धावा सुद्धा कमी पडल्या असत्या..दिल्ली आणि लखनौ संघात मुख्य फरक आहे तो कर्णधाराच्या देहबोलीचा ...दिल्ली संघाचा कर्णधार सामन्यातील पाहिले षटक टाकतो.. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येतो...षटकारांची बरसात करतो आणि संघापुढे लीड फ्रॉम फ्रंट याचा आदर्श घालतो...आणि दुसऱ्या बाजूला लखनौ संघाचा कर्णधार ७ व्या क्रमांकावर येतो ..फलंदाजीत वारंवार अपयशी ठरतो..परिणामी संघात चैतन्य निर्माण होत नाही...तंत्रज्ञानाने धावा मोजता येतात पण अजून ही चैतन्य मोजण्याचे मशीन निर्माण करता आले नाही....ते मोजता येते फक्त संपूर्ण संघाच्या देहबोली मध्ये..आय पी एल स्पर्धा प्रेरणेचा प्रवास आहे...कधी ही प्रेरणा आपल्या संघास धोनी ने दिली..कधी रोहित ने...कधी गंभीर ने. .पंत ला या प्रेरणेचा भाग व्हावा लागेल...अन्यथा गोयंका नावाचे दुर्वास आहेतच.