जालना: काही महिन्यांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते. जरांगे पाटलांच्या (Manoj Jarange Patil) या आंदोलनानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. या काळात विशेषत: मराठवाड्यातील मराठा समाज आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी प्रचंड आक्रमक झाला होता. हे आंदोलन दीर्घकाळ सुरु होते. यादरम्यान काही मराठा तरुणांनी सरकार आरक्षणाची मागणी मान्य करत नसल्याने नैराश्याच्या भरात आत्महत्या केली होती. हा मुद्दा तेव्हा चांगलाच गाजला होता. राज्य सरकारने त्यावेळी आत्महत्या केलेल्या मराठा तरुणांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करुन हा रोष शमविण्याचा प्रयत्न केला होता. 


या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जालन्यात एका मराठा तरुणाच्या आत्महत्येचा बनाव रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वडिलांनीच मुलाची हत्या करुन नंतर त्याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची खोटी कहाणी रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हा प्रकार घडला. येथील मुरुम या गावातील 19 वर्षांच्या महादेव थुटे या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता याप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. महादे थुटे याने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


महादेव थुटे याच्या वडिलांनीच त्याची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी महादेवच्या वडिलांना अटक केली आहे. शिवप्रसाद थुटे यांचा त्यांचा मुलगा महादेव याच्यासोबत वाद झाला. याच वादावेळी शिवप्रसाद थुटे यांनी रागाच्या भरात आपल्या मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर मुलाचा मृतदेह पंख्याला लटकवून त्याने आत्महत्येचा बनाव रचला. याशिवाय, आपण मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचे एक चिठ्ठीदेखील महादेवच्या मृतदेहाच्या बाजूला ठेवून दिली. त्यामुळे महादेवने आत्महत्या केली, असा सर्वांचा समज झाला.


हत्येचं गुढ कसं उकललं?


सुरुवातीला सर्वांनाच महादेव याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचे वाटले. पण डॉक्टरांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पोलिसांना वेगळाच संशय आला. त्यामुळे पोलिसांनी महादेव थुटे याचा मृतदेह व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला. त्यामध्ये महादेवचा गळा दाबून मृत्यू झाल्याची बाब समोर आली. यानंतर पोलिसांनी शिवप्रसाद थुटे यांना चौकशीसाठी बोलावले. चौकशीवेळी पोलिसी खाक्या दाखवताच शिवप्रसाद थुटे यांनी आपणच मुलाची हत्या केल्याचे कबुल केले. 


आणखी वाचा


मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र थांबेना; मराठवाड्यात दोघांनी संपवलं जीवन