जालना: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या समर्थनार्थ आज जालना जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या समर्थकांकडून अखंड मराठा समाजाच्यावतीनेही बंदची हाक दिली आहे, मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस असून काल उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती काहीशी बरी झाली आहे, दुसरीकडे वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे, काल दिवसभर मराठा आणि ओबीसी आंदोलकांमध्ये झालेल्या घोषणाबाजीनंतर आज (रविवारी) ठिकाणी तणावाचे वातावरण निवळलं असल्याचं दिसून येत आहे, तर आंतरवली सराटी मध्ये ॲड मंगेश ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं देखील उपोषण सुरू असून त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे.
वडीगोद्रीतील तणावाची परिस्थिती
वडीगोद्रीमध्ये ओबीसी आंदोलकांनी काल रस्ता रोको केला. त्यामुळे त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलकांकडून रास्ता रोको केला जात होता. पोलीस आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. शिवाय संतप्त आंदोलकांकडून पोलिसांशी हुज्जत देखील घातली जात होती. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी रात्रीपासूनच अंतरवाली सराटी जवळ चोख बंदोबस्त ठेवला.
मनोज जरांगेच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आज परभणी बंद
सकल मराठा समाजाकडून विविध ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी सुरु केलेल्या उपोषणाला पाठींबा देत आज सकल मराठा समाजाच्यावतीने परभणी बंदची हाक देण्यात आली आहे. परभणी शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ आज बंद असणार आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच आज बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले आहे.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी एक वर्षांपासून ते आरक्षणाच्या माध्यमातून लढा देत आहेत. याआधी अनेकदा आंदोलन केल्यानंतर सत्तेतील मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आंदोलनस्थळी भेटी देऊन आरक्षण देण्याचा शब्द दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरेचे अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द दिला होता. यानंतरही पुन्हा उपोषण करण्यात येत आहे.
पण प्रत्येक वेळी मंत्र्यांकडून वेळ मागवून घेतली जात आहे, मात्र शब्द पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता सहाव्यांदा जरांगे पाटील (Manoj Jarange) मैदानात उतरून आमरण उपोषण करून विधासभा निवडणुकीआधी अंतिम लढाई करत आहेत. या उपोषणाच्या पाचव्या दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने काल काही ठिकाणी बंदची हाक दिली होती तर आजही काही ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवांना या बंदमधून वगळण्यात आलेले आहे.