Santosh Deshmukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार आहेत. ते सीआयडीसमोर शरणागती पत्कारण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली आहे. 


धनंजय देशमुख हे मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. संतोष देशमुख प्रकरणातील एफआयआरचे कागदपत्र त्यांनी मनोज जरांगे यांना दाखवले. मनोज जरांगे यांची भेट घेताना धनंजय देशमुख भावनिक झाल्याचे दिसून आले तर मनोज जरांगे यांनी त्यांचे सांत्वन केले."आपण कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता न्याय मागू, त्यासाठी आपण पाठपुरावा करत राहू, असा शब्द जरांगे पाटील यांनी धनंजय देशमुख यांना दिला आहे. 


मनोज जरांगेंचा इशारा


दरम्यान, बीड येथे शनिवारी (दि.28) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. या मोर्चातून मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधत राज्य सरकारला थेट इशारा दिला होता. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं की, सत्ताधारी आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांकडे जावे. या प्रकरणातील संपूर्ण लोकांना आतमध्ये टाकावे असे बोलावे. या प्रकरणात जेवढे नावं घेतले आहेत, तेवढ्या सगळ्यांना अटक करा. देशमुख कुटुंबाच्या पाठीशी राज्यभरातून उभे राहावे लागेल. राज्यभर आंदोलनाचे हे लोण पसरले पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा, कोणीही मागे हटायचे नाही, असे आवाहन त्यांनी जनतेला केले होते. तसेच जातीयवादी मंत्री पोसणार असाल, तर आम्हाला दंडुका हाती घ्यावा लागेल, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता.   


धनंजय देशमुखांची उच्च न्यायालयात धाव


दरम्यान, धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. यामध्ये वाल्मिक कराडला सहआरोपी करु तपास व्हावा, वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटचा सहकारी आहे. त्यामुळे हा तपास नि:पक्ष होण्यासाठी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्याचे आदेश द्यावेत. त्यादृष्टीने पोलीस प्रमुख आणि राज्याच्या गृहसचिवांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी विनंती करण्यात आली आहे. यावर न्यायालय काय निकाल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आणखी वाचा 


Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबतचे ते पोलीस कोण? बीडचे पोलीस अधीक्षक म्हणाले, 'माहिती घेतो'