जालना: मनोज जरांगे पाटील गरजवंत मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जी बाजू मांडत आहेत, त्याचे उत्तर ओबीसी आरक्षण नव्हे. मराठा समाजाला (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्यावर त्यांना न्याय मिळेल, हे सांगणारे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे सल्लागार कोण आहेत? कुणबी आणि मराठा हे वेगळे आहेत, त्यांचे आचारविचार वेगळे आहेत, असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले. ते बुधवारी जालन्यातली वडीगोद्री येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी हाके यांनी गरीब मराठा समाजाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (OBC Reservation) देणे हाच एकमेव उपाय असल्याचा मनोज जरांगे पाटील यांचा दावा खोडून काढला.
महाराष्ट्रातील सरकारने आतापर्यंत ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होते. पण आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत, म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे, हे तरी समजून घ्यावे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे. महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो, हे कोणी सांगितले? आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मायबाप सरकारने ही गोष्ट समजून घ्यावी. मी घरापासून दूर आलो. तरी जालना, बीड, परभणी भागात गेलेलो आहे. पण महाराष्ट्र शासन खरं बोलायला तयार नाही, ते दूर पळत आहेत, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.
लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली
लक्ष्मण हाके यांच्या वडीगोद्री येथील उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. कालपासून लक्ष्मण हाके यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. मध्यंतरी पाणी प्यायल्याने हाके यांची प्रकृती थोडी बरी होती. मात्र, आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. रक्तदाब वरखाली होत असल्याने काल लक्ष्मण हाके यांना चक्कर येत होती. हाके यांचा रक्तदाब 178 इतका झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून ब्लडप्रेशर वाढत असल्याने त्यांना हृदयविकार किंवा पक्षघाताचा धोका उद्भवू शकतो अशी माहिती डॉक्टरांना दिली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याचे देखील डॉक्टरांचे म्हणणं आहे.
आणखी वाचा
लक्ष्मण हाकेंचे ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप