Antarwali Sarathi : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) केंद्रबिंदू बनलेल्या आंतरवाली सराटी हे गाव आज देशभरात चर्चेला आला आहे. याच गावात सुरू झालेल्या आंदोलनानंतर आज राज्यभरातील लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे. मात्र, याच अंतरवाली सराटी गावातील मराठा समाजातील एकही व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र नसल्याने या गावाला मराठा आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. अंबड महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संपुर्ण आंतरवाली सराटी गावात आजपर्यंत एकही मराठा कुणबी नोंद मिळालेली नाही. त्यामुळे, ज्या गावातून मराठा आंदोलनाची ठिणगी पडली, ज्या गावाने महाराष्ट्रातील मराठ्यांना एकत्र आणलं, ज्या गावामुळे लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि ज्या गावाने मनोज जरांगेंसारखा (Manoj Jarange) आंदोलक उभा केला त्या आंतरवाली सराटी गावातील मराठा बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे. 


आंतरवाली सराटी हे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील छोटेस गाव, मात्र हेच गाव आज मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मराठा आरक्षणाच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी याच गावातून घडतायत. याच आंतरवाली सराटीमधील आंदोलनानंतर महाराष्ट्रातील मराठे पहिल्यांदाच एकत्र आले. एवढंच नाही तर याच आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या आंदोलनानंतर, महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांना आज कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे. पण दुर्दैवाने याच आंतरवाली सराटी गावातील एक ही मराठा व्यक्तीकडे कुणबी प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं आहे.


जालन्यात 127 मराठा कुणबी नोंदी आढळल्या...


अंबड तालुक्यातील 138 गावांमध्ये 2 लाख 88 हजार 523 दस्तावेज तपासण्यात आले. ज्यात 12 गावात 127 मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या. विशेष म्हणजे या 12 गावात आंतरवाली सराटीचा समावेश नसल्याचा देखील समोर आला आहे. मराठा आरक्षणासाठी ज्या आंतरवाली सराटीने एवढं मोठं आंदोलन उभं केलं, त्याच आंतरवालीतील मराठ्यांना आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे यात मनोज जरांगे यांचा देखील समावेश आहे. 


मनोज जरांगेंनी आंदोलन केलेल्या गावात नोंदी नाही...


फक्त आंतरवाली सराटीच नाही, तर अनेक गावात मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या नसल्याने मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील निरंक अहवाल दिला होता, आता त्यानंतर तिथे मराठा कुणबी नोंदी आढळून आल्या असा आरोप जरांगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ज्या-ज्या गावात आंदोलन केले आहे, त्या सर्वच गावात एकही मराठा कुणबी नोंद मिळालेली नाही. 


आत्तापर्यंत मिळालेल्या नोंदी...



  • जालना जिल्ह्यात एकूण 2 लाख 88 हजार 523 कागदपत्रे तपासण्यात आले आहेत.

  • 51 हजार 550 खासरापत्रक तपासले गेले आहेत.

  • 51 हजार 900 पाहणी पत्रक तपासले गेले.

  • 30 हजार कुळ नोंदवही तपासल्या गेल्या.

  • 1 लाख 33 हजार 450 नमुना हक्क नोंदी तपासण्यात आले आहेत.

  • 21 हजार 630 सातबारे तपासले गेले.

  • त्यानंतर एकूण 127 कुणबी नोंदी आढळल्या आहेत. 


आंतरवाली सराटी गाव मराठा आरक्षणापासून वंचित राहणार...


मराठा आरक्षणाचा मार्ग दाखवणारा, मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारा, आणि मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला भाग पाडणारा आंतरवाली सराटी गाव, पण याच आंतरवाली सराटी गावात एकही मराठा कुणबी नोंद आढळून आली नाही. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्रांच्या आधारावर सरकारने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची घोषणा केली तरी, त्यापासून आंतरवाली सराटी मात्र वंचित राहणार हे नक्की आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Exclusive: काय सांगता! उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबाकडेच नाही निजामकालीन कुणबी नोंद