जालना (आंतरवाली सराटी) : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर, प्रत्येक गावात आजपासून साखळी आमरण उपोषण सुरु करा, उपोषणात कुणाचा जीव गेल्यास सरकार जबाबदार असेल असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला आहे. सोबतच आपण एक पाऊल मागे घेऊन सरकारसोबत चर्चा करण्यासाठी तयार असून, त्यांनी लवकरात लवकर आरक्षणाचा तिढा सोडवला पाहिजे असेही जरांगे म्हणाले आहेत. 


मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे आजपासून (28  ऑक्टोबर) राज्यभरातील गावागावात सुरु असलेल्या साखळी उपोषणाचे आमरण उपोषणामध्ये रूपांतर होणार आहे. जरांगे यांनी पाणी घेऊन अमरण उपोषण करण्याचे आवाहन मराठा आंदोलकांना केले आहे. दरम्यान नियोजन करणाऱ्या आंदोलकांनी तसेच वयोवृद्ध नागरिकांनी आमरण उपोषण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 


एक पाऊल मागे जात सरकारशी चर्चेची तयारी 


सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. या काळात त्यांनी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, आंतरवाली गावात देखील कोणत्याही राजकीय नेत्यांना एन्ट्री नसणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यातील चर्चेचे दारं बंद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, आता आपण एक पाऊल मागे घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. पण ही एकदाच संधी असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच आपण चर्चा करणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. 


आंतरवालीत गर्दी वाढली...


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजातील बांधव आंतरवाली सराटी गावात गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. सोबतच परिसरात असलेल्या गावातील गावकरी देखील उपोषणास्थळी येत आहे. आज पाचव्या दिवशी तर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरवात केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मराठवाड्यात पुरावे सापडले तरी सर्वच मराठ्यांना आरक्षण द्यावं लागेल, अर्धवट आरक्षण घेणार नाही; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा