जालना : आंदोलकांच्या आग्रहाखातर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण आता पाणी पितोय पुन्हा पिणार नाही असा इशाराही यावेळी जरांगे यांनी दिला. पण त्यांनी डॉक्टरांना देखील तपासणी करण्यापासून अडवल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्याचप्रमाणे आंदोलकांना भावनिक न होण्याचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी केलं. जरांगे यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांना देखील त्यांनी पुन्हा एकदा माघारी धाडलं आणि उपचार घेण्यास नकार दिला. 


अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस असून जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत चाललीये. त्यामुळे त्यांना निदान पाणी तरी घ्यावं अशी विनंती हे आंदोलक करत होते. खूपच विनंती केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाण्याचा एक घोट घेतला. पण यापुढे काहीच घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिला. 


तुम्ही भावनिक होऊ नका - मनोज जरांगे 


तुमची माया मी लोटून लावत नाही. पण पाणी पिऊन आणि सलाईन लावून आपल्याच लेकरांचा घात होऊ शकतो. आपल्या न्यायाचा दिवस जवळ आलाय. कोणाला तरी एकाला जीवाची बाजी लावून लढावे लागेल. मला माझ्या वेदना माहिती आहेत. त्यामुळे तुम्ही भावनिक होऊ नका, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. 


राजीनामे देण्यापेक्षा एकत्र या, जरांगेंचं आवाहन


हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. यावर देखील मनोज जरांगे यांनी राजीनामा न देण्याचं आवाहन आमदार आणि खासदारांना केलंय. यावर बोलताना म्हटलं की, राजीनामे देऊन आपलीच संख्या कमी होईल.  राजीनामे देण्या पेक्षा एकत्र या. मुंबईत बसून सरकार ला वेठीस धरा. राजीनामे देऊ नका. सगळ्यांनी मुंबईकडे कूच करा. समाज तुम्हाला विसरणार नाही. 


'चर्चा फक्त अंतरवली सराटीच्या व्यासपीठावरच होणार'


जरांगे यांनी सरकारसोबत चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. पण चर्चा ही फक्त अंतरवली सराटीच्या व्यासपीठावरच होईल असा आग्रह देखील त्यांनी यावेळी धरला आहे. सरकार आणि फडणवीसांनी चर्चेची तयारी दाखवली असली तरी आम्ही चर्चेची दारं बंद केली होती. पण आमच्यावर खापर फुटेल म्हणून फक्त एकदाच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. पण ही चर्चा फक्त अंतरवली सराटीच्या व्यासपीठावरच होईल, असं जरांगे यांनी म्हटलं. 


जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. पण त्यांची प्रकृती ढासळत चाललीये. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी तोडगा काढावा अशी मागणी सध्या जोर धरु लागलीये. 


हेही वाचा : 


Maratha Reservation : जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा, मराठा आरक्षणावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?