जालना: राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण करणे टाळले होते. मात्र, ही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून पु्न्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, नंतर ही तारीख बदलून 8 जून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी (Jalna Police) कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. परंतु, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. 


पोलिसांच्या परवानगीशिवाय मनोज जरांगे आता आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसतील. यानंतर आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणस्थळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मराठा  आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मनोज जरांगे हे प्रकाशझोतात आले होते आणि आंतरवाली सराटी (antarwali sarati ) येथील त्यांचे आमरण उपोषण मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation agitation) केंद्र झाले होते. हा अनुभव लक्षात घेता पोलीस आता मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


परभणीचे खासदार बंडू जाधव मनोज जरांगेच्या भेटीला


बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांच्यानंतर परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी शुक्रवारी रात्री उशिरा  मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी बंडू जाधव यांचा सत्कारही केला.रात्री उशिरा अंतरवाली सराटी गावात ही भेट झाली.


मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचा विरोध


जालन्यातली आंतरवाली सराटी हे गेल्या काही महिन्यांमध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला होता. मात्र, आंतरवाली सराटीमधील ग्रामस्थांनीच अलीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला विरोध केला होता. आंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन दिले होते. तसेच आजूबाजूच्या गावातील दिलेल्या निवेदनावरून प्रशासनाने जातीय सलोखा बिघडण्याची शक्यता तसेच ग्रामपंचायतच्या कामांना अडथळा आणि महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. याशिवाय, उपोषणाच्या जागेबाबत ग्रामसभेचे कोणतीही कागदपत्रं सादर न केल्यामुळे जरांगे पाटील यांना ही परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणावर ठाम आहेत.


आणखी वाचा


यह डर जरुरी है, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे महत्त्वाचं, लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य