जालना : ओबीसी समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढू देणार नसल्याचं वक्तव्य करणाऱ्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी जहरी टीका केली आहे. 'थोडी लाज ठेवा, कुत्रा चावल्या सारखं बोलू नका, तुम्ही फक्त एका समाजाचे विरोधी पक्षनेते नाहीत,' अशा शब्दात जरांगे यांनी वडेट्टीवार यांना सुनावले आहेत. मनोज जरांगे यांनी कालपासून पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) आमरण उपोषण सुरु केले असून, यावेळी बोलतांना त्यांनी वडेट्टीवारांचा समाचार घेतला.
दरम्यान वेडट्टीवारांवर बोलतांना जरांगे म्हणाले की, "त्याला दुसरं काय काम आहे. त्याला राहून राहून कुत्रा चावल्यासारखं होतं. एकदा मराठ्यांच्या बाजूने बोलतो, तर कधी मराठ्यांच्या विरोधात बोलतो. कुत्रा चावल्यासारखं बोलणं योग्य नाही. राजकीय करिअरसाठी आणि माणूस म्हणून देखील हे बरोबर नाही. राहुल गांधी ज्याज्या वेळी सांगणार त्याच वेळी तू बोलतो, मध्ये बोलत नाही. राहुल गांधी यांनी यासाठीच तुला विरोधी पक्षनेता बनवलेलं नाही. त्यामुळे एकाच जातीकडून बोलू नयेत. विरोधी पक्षनेता म्हणजे तो महाराष्ट्रातील जनतेचा हक्काचा व्यासपीठ आहे. या हक्काच्या व्यासपीठावरून त्याने एकाच जातीला ओढायला नको पाहिजे. त्याने स्वतःचा पक्ष संपवण्याची आणि सुपडासाफ करण्याची भूमिका घेतली असल्याचं वाटत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी त्याला सांगितलं वाटतं, 'तू बोलत रहा, बिनधास्त बोल, महाराष्ट्रात मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे, त्यासाठीच तुला विरोधी पक्षनेता केला आहे. तू फक्त ओबीसींचाच विरोधी पक्ष नेता आहे, असे म्हणत जरांगे यांनी वेडट्टीवारांवर जहरी टीका केली.
भुजबळांवर देखील टीका...
याचवेळी मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे. 'विजय वेडट्टीवार आणि छगन भुजबळ दोघेही असेच आहे. शेपूट नसल्यासारखं बोलायचं, कधीतरी लाज राखली पाहिजे, किमान त्या पदाची तरी लाज राखा, स्वतःची लाज नसेलच त्यांना, पण पदाची लाज राखली पाहिजे. त्या भंगारच ऐकून विजय वेडट्टीवार यांनी देखील बोलायला नको पाहिजे. विरोधी पक्षनेता विचाराने चांगला असला पाहिजे. सगळ्या जनतेचा असला पाहिजे. त्यामुळे भुजबळांचं ऐकून त्यांनी कशाला बोलावं. ते पहिल्यापासूनच वायाला गेले असल्याचं म्हणत जरांगे यांनी विजय वेडट्टीवारांसह भुजबळांवर देखील निशाणा साधला.
आजपासून पुन्हा आमरण उपोषण...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणावर बसण्याचा निर्णय घेतला आहे. कालपासून (10 फेब्रुवारी) मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये आपलं उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंतचे सर्वात कठोर उपोषण करणार असल्याचे देखील जरांगे यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :