जालना : जिल्ह्यातील अंबडमध्ये ओबीसी आरक्षण (OBC Reservation) बचाव एल्गार सभेत बोलतांना मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली. विशेष म्हणजे याचवेळी भुजबळ यांनी आंतरवाली सराटीत (Antarwali Sarathi) आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या वादावर सुद्धा काही सवाल उपस्थित केले. त्यामुळे 1 सप्टेंबर रोजी त्या दिवशी नेमकं काय घडलं? याबाबतचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहू यात...


17 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावापासून 20 ते 22 किलोमीटर असलेल्या  अंबडमध्ये ओबीसीं आरक्षण बचाव सभा घेण्यात आली. याच सभेत मोठ्या गर्दीला संबोधित करताना छगन भुजबळानी मनोज जरांगे यांच्यावरती सडकून टीका केली. याचवेळी आंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जवर सरकारला धारेवर धरलं आणि काही सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केले. भुजबळांच्या मतानुसार 1 सप्टेंबर रोजी पोलिसांवरती अमानुषपणे दगडफेक करण्यात आली, तसेच महिला पोलिसांवर देखील हल्ला करण्यात आला. तर, यावेळी भुजबळांनी छत्रपती शिवरायांनी मोघलांच्या सुनेला आई म्हणून परत पाठवलं याचे उदाहरण देत, मराठा आंदोलकांनी महिला पोलिसांवर हल्ला केला असल्याचा आरोप केला. याशिवाय, पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची एकच बाजू समोर आली असून, दुसरी बाजू समोर आलीच नसल्याचे भुजबळ म्हणाले. 


दगडफेकीच्या संदर्भाने पोलिसांत नेमकी काय नोंद? 


पोलिसांनी केलेल्या नोंदीनुसार, " 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या दरम्यान, मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यांना उपचाराची गरज होती. त्यामुळे, काही पोलीस अधिकारी व अंमलदार, महसूल अधिकारी यांनी मनोज जरांगे यांना सहा वाजेपर्यंत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आंदोलनास्थळी जमलेल्या पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्यासोबत आंदोलकांनी हूज्जत घालून, जीवे मारण्याच्या उद्देशाने पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यावर कट रचुन दगडफेक केली. तसेच, सार्वजनिक मालमत्तांचे जाळपोळ करून नुकसान केले. याप्रकरणी जालन्यातील गोंदी पोलीस ठाण्यात 16 ज्ञात आणि तीनशे ते साडेतीनशे अज्ञात लोकांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, कट रचने यासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 


स्वतःच्या संरक्षणासाठी लाठीचार्ज केला


याप्रकरणी पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलकांनी हुज्जत घालत ढकला ढकल करत पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याला खाली पाडलं. त्यामुळे स्वतःच्या संरक्षणासाठी लाठीचार्ज केला आणि याच दरम्यान तुफान दगडफेक देखील झाली. तर, मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेले सवाल आणि पोलीस दप्तरी असलेली नोंद किंवा पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे एकच आहे.


पोलीस महासंचालकांच्या समितीच्या अहवालानंतर खुलासे होणार 


यावेळी आंदोलकांची बाजू जाणून घेतल्यावर पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज केल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या या लाठीमारमध्ये अनेक आंदोलक जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे खरं असले तरीही आंदोलकांनी पोलिसांवर केलेली दगडफेक गंभीर होती. विशेष म्हणजे, पोलीस दप्तरी गोळीबार झाल्याची, तसेच स्वसंरक्षणासाठी अश्रू धारांच्या नळकांड्या फोडल्याची एफआयआरमध्ये नोंद नाही. आंदोलकांची पोलिसांविरुद्ध टोकाची भूमिका आणि त्यानंतरची पोलिसांवर सरकारकडून केलेली कारवाई अधिक घाईची झाल्याने या घटनेचे अनेक कांगोरे अद्याप समोर येणे बाकी आहेत. त्यामुळे सरकारने नेमलेल्या पोलीस महासंचालकांच्या समितीच्या अहवालानंतर यातील अनेक बारीक मुद्दे समोर येऊ शकतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Jalna : अंतरवली सराटीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला होता? देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठी बातमी समोर