जालना : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या फोनवरुन संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. यावर मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांनी त्यांचं टिकास्त्र डागलं. 'अमित शाह यांना माझा नंबर द्या, मी त्यांना सांगतो राज्यातील परिस्थिती अत्यंत बेकार आहे ते',असं मनोज जरांगे यांनी म्हटलं. पण अमित शाह यांना फक्त फडणवीसांना फोन लावता येतो असं म्हणत मनोज जरांगे यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला.  राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर केंद्रीय गृहखात्याकडून या गोष्टीची दखल घेण्यात आली. 


दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला. 'जर पंतप्रधान मोदी असेच वागेल तर कसे काय पुन्हा पंतप्रधान होतील?' असा सवाल यावेळी जरांगे पाटलांनी उपस्थित केला. त्यामुळे जरांगे पाटलांनी यावेळी थेट पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. आतापर्यंत मनोज जरांगे यांनी सरकावर अनेक वार केले होते. पण यावेळी जरांगेनी थेट केंद्रावरच टीका केलीये. 


जरांगे पाटलांचं पुन्हा सरकारला अल्टिमेटम


मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय अमान्य असल्याचं म्हटलं.  राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकारकडे आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी फक्त ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच प्रमाणपत्र देणार असल्याचे म्हटले आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. 


मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलीये. राज्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळे या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीत मराठा आरक्षणावर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


हेही वाचा : 


Maratha Reservation : एक उपमुख्यमंत्री जबाबदार, मनोज जरांगेंकडून फडणवीस टार्गेट; तुमच्याकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, सरकारला अल्टिमेटम


Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक अधिक जबाबदार; एकाला काड्या करण्याची जास्त सवय; जरांगे पाटलांचा निशाणा नेमका कोणावर?