अंतरवाली, जालना:  मराठा आरक्षणांसाठी उपोषणावर असलेले आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत थेट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला. सरकारच्या धमक्यांना घाबरणार नाही. अंगावर आल्यावर सोडणार नाही असा इशारा जरांगे यांनी दिला.


राज्यातील वातावरण खराब करण्यात एक उपमुख्यमंत्री खास करून जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्यामुळे भाजप संपत आली असल्याची बोचरी टीका जरांगे यांनी केली. 


तुमच्याकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, सरकारला अल्टिमेटम


मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत सरकारने आज घेतलेला निर्णय अमान्य असल्याचे म्हटले. राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा करून शिंदे समितीचा प्रथम अहवाल तयार करावा. उद्यापर्यत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या पासून पाणी घेणे बंद करणार असल्याचा इशाराही जरांगे यांनी दिला. सरकारकडे आपण सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांनी फक्त ज्यांच्याकडे नोंदी असतील अशांनाच प्रमाणपत्र देणार असल्याचे म्हटले आहे. सरकारची ही भूमिका चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, त्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सरकारकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस असल्याचे मनोज जरांगे यांनी म्हटले. 


जरांगे यांचा फडणवीसांवर निशाणा


मनोज जरांगे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.  महाराष्ट्रातील कोणत्याही आंदोलकाला त्रास दिला तर आम्ही सरकारला सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. एकदा झाले आता पुन्हा यापुढे सहन करणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले. नेत्यांचे घर कोणी जाळले आम्हाला माहिती नसल्याचे सांगत भाजप तुमच्या मुळेच संपायला आलाय असेही जरांगेंनी म्हटले. आमच्या पैशावर बासुंदी ,गुलाबजामुन खातात, आता तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्ही किती ताकतवर आहेत, किती 307 करायचे ते करा असा आव्हानही जरांगे यांनी दिले.