जालना: जालन्यामध्ये कौटुंबिक वादाचं स्वरूप इतकं वाढलं की, सुनेने सासूचा निर्घृनपणे खून केल्याची घटना काल (बुधवारी, ता,2) पहाटे जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनी परिसरात घडली. खून केल्यानंतर सुनेने सासूचा मृतदेह पोत्यात घालून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न देखील केला, पण तो प्रयत्न फसला. या प्रकरणात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता संजय शिनगारे (वय 45, ह. मु, प्रियदर्शनी कॉलनी, जालना, मूळ रा. वावरे अंतरवाली, ता. गेवराई, जि. बीड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर प्रतीक्षा आकाश शिनगारे असे सुनेचे नाव आहे. असं काय घडलं ज्यामुळं सहाच महिन्यांपुर्वी घरी आलेल्या सुनेने सासूला अशा प्रकारे संपवलं.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपासून आपली सून कोणाशी तरी फोनवर बोलते आहे, पण नेमके कोणासोबत तिच्या गप्पा चालतात, हे सासूला समजत नव्हतं. या कारणामुळे दोघींमध्ये काहीशी भांडणं होत होती. त्या दिवशी (बुधवारीही) याच कारणामुळे दोघींमध्ये सकाळी वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या प्रतीक्षाने रागाच्या भरात सासू सविता शिनगारे यांच्यावर चाकूने सपासप वार करुन त्यांचा जीव घेतला. मानेवर अनेक जखमा झाल्या. अतिरक्तस्रावामुळे सासू सविता शिनगारे यांचा मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या प्रतिक्षाने सासूला एका गोणीत भरलं. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नात ती होती. ती गोणी ओढत खाली आणली पण घरमालकाचे लक्ष आपल्याकडे आहे हे लक्षात येताच तिने ती गोणी तशीच ठेवून पळ काढला. तिने थेट रेल्वे स्टेशनला जाऊन परभणीतील घर गाठलं. त्यानंतर घरमालकाने तत्काळ पोलिसांना फोन केला आणि घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला, मृतदेह ताब्यात घेऊन फरार सुनेला पकडलं. 

 दोघींमध्ये बुधवारी पहाटे वाद 

सविता शिनगारे यांचा मुलगा आकाश हा लातूर येथे एका खासगी कंपनीत कामाला होता. त्यामुळे तो लातूर येथे राहायचा. तर आई सविता व पत्नी प्रतीक्षा या जालना येथील भाड्याच्या घरामध्ये राहात होत्या. त्या दोघींमध्ये बुधवारी पहाटे वाद झाला आणि त्यातून प्रतीक्षाने सविता शिनगारे यांचे डोके भिंतीला आपटून आणि चाकूने वार करीत त्यांचा खून केला.

रेल्वेने गाठली परभणी

प्रतीक्षा शिनगारेचं माहेर परभणी आहे. सासूचा खून केल्यानंतर तिने घराबाहेर पडत थेट रेल्वे स्थानक गाठले. तेथून परभणी येथील नातेवाइकांच्या घरी ती गेली. या घटनेनंतर तिच्या शोधात असणाऱ्या एलसीबीच्या पथकाने मोबाइल लोकेशनवरून परभणी शहर गाठत एका नातेवाइकांच्या घरातून तिला ताब्यात घेतले.

मुलाने फोडला टाहो...

आकाश लातूर हून थेट जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला आणि त्याने तिथेच हंबरडा फोडला. आईचा मृतदेह पाहून आकाश जागीच खाली बसला. त्याला इतर नातेवाईकांनी सावरण्याचा प्रयत्न केला. "माझ्या आईला का मारलं? मारायचं होतं तर मला मारायचं, असं तो मोठमोठ्याने रडत रडत म्हणत होता. माझ्यासोबत पटत नव्हतं, तर लग्न करायचं नव्हतं. लग्न कशाला केलं? माझ्या आईसोबत पटत नव्हतं तर, मला मारायचं असतं, कोणी एवढे निर्दयीपणे मारतं का?".