जालना : जिल्ह्यातील अंबड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहात (Jalana Government Polytechnic College Hostel) राहणाऱ्या एका 19 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. कन्हैया गहुले असे मयत विद्यार्थ्याचे नाव असून तो पॉलीटेक्निकच्या प्रथम वर्षात शिकत होता. वसतिगृहाच्या निष्काळजीपणामुळे आपल्या मुलाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
कन्हैया गहुले या विद्यार्थ्याला रविवारी सकाळी अचानक चक्कर आली. त्यावेळी मित्रांनी तातडीने रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. या प्रकारावर मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी गंभीर आक्षेप नोंदवले. कॉलेज प्रशासन आणि वसतिगृहाचे रेक्टर यांनी वेळेवर योग्य ती मदत न दिल्याचा आणि हलगर्जीपणा केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी रेक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलिस करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.