जालना : मला कधीही अटक होऊ शकते, मात्र या अटकेला मी भीत नाही. अटक केल्यास जेलमध्ये देखील मी उपोषण सुरु करेल असा गंभीर आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी सरकारवर गंभीर आरोप करत हल्लाबोल केला असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पुढील दोन दिवसांत मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे असा इशारा देखील जरांगे यांनी सरकारला दिला आहे. 


याबाबत बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मला अटक केल्याशिवाय त्यांच्यापुढे दुसरा कोणताही पर्यायच नाही. मात्र, माझा मराठा समाज सावध आहे. तसेच अटकेला मी भीत नाही. मी कितीही वेळ आतमध्ये बसायला तयार आहे. अटक केल्यावर मी आतमध्येच उपोषण सुरु करेल. जेलमध्ये मी जेवण करणार नाही आणि त्यांना देखील करू देणार नाही. तसेच जेलच्या भिंतीवरून उडी मारेल. मी आतमध्ये जगूच शकत नाही. मराठा समाजासाठी मी जीव द्यायला तयार असल्याचे जरांगे म्हणाले.  


संपूर्ण 6 कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार 


आंतरवाली सराटीमधील प्रकरणात लोकांना का अटक केले. एकालाही अटक करणार नसल्याचा शब्द दिला होता. तसेच मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेऊ असे देखील सांगितले होते. पण गुन्हे मागे घेण्यात आले नाही. अटक करण्याचे कारण काय आहे. न्यायालयीन कोठडी झाल्यावर देखील पोलीस कोठडी कशी काय देण्यात येते. त्यामुळे आम्हाला अटक करण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे. पण यासाठी आम्ही तयार आहोत. पोलिसांना अटकच करायची असेल ना, तर मग संपूर्ण 6 कोटी मराठा अटक होण्यासाठी तयार आहे. अटकच पाहिजे तर आम्हाला सर्वांना अटक करा. आम्हाला कधीच सोडणार नाही का?, मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून आम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा होणार आहे का?, याचसाठी आम्ही तुम्हाला आम्ही सरकारमध्ये बसवले का?, तुम्हाला थोडी तरी काही वाटले पाहिजे. महिलांचे डोके फोडले असून, त्याबद्दल थोडीतरी माया असली पाहिजे आणि त्यालाच सरकार म्हणतात, असेही जरांगे म्हणाले. 


न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का?


आंतरवाली सराटीतील पोलिसांवर करण्यात आलेला हल्ला आणि दगडफेक प्रकरणातील प्रमुख आरोपी ऋषिकेश बेदरे याला झालेल्या अटकेनंतर आधी न्यायालयीन आणि त्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, अंबड न्यायालयाने दिलेल्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील पोलीस आणि न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपणार आहे. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांकडून ऋषिकेश बेदरे याला आज अंबड न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यामुळे न्यायालयाकडून बेदरेला आज जामीन मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Manoj Jarange Patil : काही झालं तरी त्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाही, तो जातीवाद करतोय, भुजबळांचा एकरी उल्लेख करत जरांगे पाटील पुन्हा बरसले