जालना: मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरकारने इतर मागण्या मान्य कराव्या यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केल्यानंतर या उपोषणावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे. त्यांचं आंदोलन बिनबुडाचं आहे. मनोज जरांगे पाटील हे पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. ‘हैदर, अकबर, निजाम अरे भाई जरांगे आणखी काही लोकांना बोल, विचार करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल’ असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हणत जरांगेंवर टीका केली होती. त्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करायला हवं असं म्हणत हल्लाबोल केला आहे.


काय म्हणालेत सचिन खरात?


गुणरत्न सदावर्ते सतत मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या बद्दल अत्यंत खालच्या भाषेमध्ये बोलत असतात, परंतु मी सदावर्ते त्यांना सांगू इच्छितो, मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी स्वतःच्या समाजासाठी मरायला सुद्धा तयार आहेत, आणि जरांगे हे शिवाजी महाराजांच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन चाललेले आहेत. परंतु तुम्ही तर परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी ब्र शब्द सुद्धा उच्चारला नाही आणि त्यांच्या कुटुंबाची अजून पर्यंत भेट सुद्धा घेतली नाही. तुम्ही तर नथुराम गोडसे यांच्या विचाराचे आहात हे तुम्ही स्पष्टपणे सांगता. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत खरातांनी सदावर्तेला लक्ष्य केलं आहे. 


महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्यावर सतत गुणरत्न सदावर्ते खालच्या भाषेमध्ये टीका करत असतात, हे अतिशय चुकीचे आहे. मुळात मनोज जरांगे हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. आणि आंदोलन करत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते मरायला सुद्धा तयार आहेत असे ते स्पष्टपणे बोलत असतात आणि जरांगे हे रयतेचे राजे शिवाजी महाराज यांच्या विचारांना पुढे घेऊन चालले आहेत परंतु गुणरत्न सदावर्ते तुम्ही तर परभणी जिल्ह्यातील भीमसैनिक सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कस्टडीत मृत्यू झाला. तुम्ही याबद्दल शब्द देखील उच्चारला नाही. तुम्ही यांच्या कुटुंबाची भेट देखील घेतली नाही आणि तुम्ही तर जाहीरपणे स्वतःला नथुराम गोडसे यांच्या विचारांचे कट्टर समर्थक सांगतात. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या मेंदूचे अलाइनमेंट करण्याची वेळ आली आहे असं दिसतंय, असंही सचिन खरात पुढे म्हणालेत.


नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 


'मनोज जरांगे पाटील म्हणजे एक स्टंटबाज आहे. त्यांचं आंदोलन बिनबुडाचं आहे. हे आंदोलन म्हणजे मनोज जरांगे आणि सुरेश धस यांच्यातील धावण्याची स्पर्धा आहे. प्राथमिक शाळेत धावण्याची जी स्पर्धा असते, ना, तशी ही स्पर्धा आहे. या आंदोलनाला राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाचा नेता कोण? हे दर्शवणारं हे आंदोलन आहे. सुरेश धस असो की मनोज जरांगे पाटील हे दोन्ही पॉलिटिकली मोटिव्हेटेड आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहेत. मराठा भावांना हे माहिती झालेलं आहे की, आरक्षण हे कोणत्याही परिस्थितीमध्ये 50  टक्क्यांच्या वर देता येत नाही. ‘हैदर, अकबर, निजाम अरे भाई जरांगे आणखी काही लोकांना बोल, विचार करून घ्या, म्हणजे तुम्हाला समजेल'.


'एका विशिष्ट हेतूनं हे सर्व काही सुरू आहे. स्वत:ची इमेज तयार करणे किंवा माया मिळवणं याच्यासाठी हे सगळं सुरू आहे. सुरेश धस आणि मनोज जरांगे पाटील यांचं केविलवाणं आंदोलन सुरू आहे. खरे जातीवादी कोण आहेत? हे सुरेश धस यांच्या वर्तनावरून आणि जरांगे पाटील यांच्या कार्यप्रणालीवरून आता महाराष्ट्राला समजले आहे', असंही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलं आहे.