BSNL 4G-5G Services : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांच्या दूरदृष्टीपणामुळे लवकरच बीएसएनएलची (BSNL) 4 जी आणि 5 जी सुरू करणार असून, त्यासाठी लागणारी जमीन देशातील सर्व राज्यसरकार मोफत उपलब्ध करवून देणार आहे. त्यामुळे लवकर ही सेवा सुरू होणार असून, बीएसएनएलला पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार असा विश्वास महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे बीएसएनएल मुख्य महाप्रबंधक रोहित शर्मा यांनी जालना (Jalna) येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. शर्मा हे जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या सेवांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


पुढे बोलताना शर्मा म्हणाले की, मार्केट कंट्रोल करण्यासाठी आणि प्राईस वार थांबवण्यासाठी बीएसएनएलची सेवा सुरू होणे अत्यंत गरजेचे आहे. देशात सर्वात स्वस्त आणि किफायतशीर सेवा फक्त बीएसएनएल देऊ शकेल असा विश्वास केंद्र सरकारला असून, भारतात बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेला गतवर्षी जुलै महिन्यात मंजुरी मिळाली होती. त्यानुसार बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी देशभरात 20 हजार टावर्स उभारले जात आहेत. ज्या गावात 4G सेवेचे सिग्नल मिळत नाही, अशा 34 हजार गावातही 4G सेवा उपलब्ध होणार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेचे तंत्रज्ञान हे भारतातच विकसित करण्यात आले असून, हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला असल्याचे ते म्हणाले.


राज्यातील 2 हजार 800 गावात उभारणार 4G-5G टॉवर


महाराष्ट्र राज्यात 4G व 5G सेवा कार्यान्वित होण्यासाठी 2  हजार 800 गावात नवीन टावर्स उभारले जाणार असून, त्यासाठी सरकारी जमीनीचे अधिग्रहण करण्यात आले असल्याचे शर्मा यांनी सांगितले. बदलत्या तंत्रज्ञानामुळे बीएसएनएल आता कमी मनुष्यबळाचा वापर करीत आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाच्या इमारती रिकाम्या झाल्या आहेत. जालना येथील टेलीफोन भवनातील खालचा मजला रिकामा झाला असून तो आता किरायाने देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाप्रबंधक संजय केशरवानी यांनी औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील बीएसएनएलच्या 4G व 5G सेवेसाठी नवीन टावर्स उभारले जाणार असल्याचे सांगून वर्तमान सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी देता येईल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


BSNL Revival Plan: केंद्रीय मंत्रिमंडळाकडून BSNLसाठी 89,000 कोटी रुपयांच्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी