Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार उन्मेष पाटील (Unmesh Patil) यांचे तिकीट कापून स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे उन्मेष पाटील नाराज असून त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. त्यानंतर उन्मेष पाटील यांनी मातोश्री गाठत उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उद्या उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उन्मेष पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे, संजय राऊत, उन्मेष पाटील, करण पवार आणि संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्यात बैठक झाली. जळगावमधून उन्मेष पाटील किंवा करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
जळगावातून उन्मेष पाटलांना उमेदवारी?
भाजपने विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारल्याने पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटात ते आणि त्यांच्या पत्नी प्रवेश करतील, असे बोलले जात आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात उन्मेष पाटील यांनी आधी संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. आता उन्मेष पाटील हे शिवसेना ठाकरे गटात करणार का? जळगावातून उमेश पाटील यांनी स्मिता वाघ यांच्या विरोधात उमेदवारी देणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भाजपचे करण पवार यांचेही नाव चर्चेत
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी ठाकरे गटाकडून भाजपचे युवा पदाधिकारी व पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्याही नावाची चर्चा सुरु आहे. करण पवार हे प्रबळ उमेदवार ठरू शकतात. करण पवार लोकसभा मतदार संघातील लढतीचे गणित बदलवतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून समजुतीचा प्रयत्न
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उन्मेष पाटील यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उन्मेष पाटलांना फोन करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता उन्मेष पाटील भाजपातच राहणार का? ठाकरे गटाची वाट निवडणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या