जळगाव : शरद कोळी यांना नोटीस देण्यासह पोलिसांच्या कारवाईवर उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद कोळी अनुसूचित जमातीचे असल्यामुळे, उपेक्षित वर्गाकडून असल्यामुळे जातीयवादी मानसिकता ठेवून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सांगण्यावरून पोलिस ही कारवाई करत आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. महाप्रबोधन यात्रेला खीळ घालण्यासाठी ही कारवाई असून, दुसरीकडे प्रकाश सुर्वे हातपाय तोडण्याची भाषा करतात मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही असंही त्या म्हणाल्या.

Continues below advertisement

सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशा कितीही कारवाया केल्या तरी तुम्ही आमचा आवाज बंद करू शकणार नाही. एकेक करत असं किती जणांना तुम्ही अटक कराल? मात्र तुम्ही आमची उमेद मारू शकणार नाही. "सर्फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ए कातील मे है." असं म्हणत सुषमा अंधारे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांनाही आव्हान दिले आहे.

उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे शरद कोळी यांना जळगाव जिल्ह्यातील सभांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर नोटीस बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांना कार्यकर्त्यांनी विरोध केला. 

Continues below advertisement

शरद कोळी यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात धरणगाव येथील सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यावरून गुजर समाजाने तसेच शिंदे गट सेनेतर्फे शरद कोळी यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली होती. त्यांच्याकडून देण्यात आलेल्या निवेदनाची दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून शरद कोळी यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील सभांना भाषण करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतची नोटीस देण्यासाठी  पोलिस शरद कोळी राहत असलेल्या हॉटेलवर गेले पोलीस गेले असता, या ठिकाणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निषेध केल्याने मोठा गोंधळ उडाला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा जळगाव जिल्ह्यात दाखल झाली आहे. दोन दिवसांपूर्वी धरणगाव तर बुधवारी पाचोरा आणि एरंडोल येथे यानिमित्त सभा झाल्या. यात सुषमा अंधारे यांच्यासोबत युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांनी अतिशय आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात अतिशय शेलक्या भाषेत टीका केली. त्यानंतर आजच त्यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी गुजर समाजबांधवांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांना निवेदन दिले होते. याची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी शरद कोळी यांना जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि मुक्ताईनगर येथील सभांमध्ये भाषण करण्यास बंदी घातली आहे. पोलीस प्रशासनाने याबाबतची नोटीस आज कोळी यांना जारी केली.