Rohini Khadse : केंद्रीय मंत्री रक्षा खडसे (Raksha Khadse) यांच्या मुलीसह काही मुलींची मुक्ताईनगर (Muktainagar) तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताईयात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी संताप व्यक्त केलाय. महिला सुरक्षेसाठी गृह खाते हे अपयशी ठरलेलं आहे. पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. 

रोहिणी खडसे म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज पुन्हा समोर आल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटना अनेक ठिकाणी घडत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची म्हणजेच माझ्या भाचीची दोन दिवस आधी आदिशक्ती मुक्ताई मंदिराच्या यात्रेमध्ये छेडछाड करण्यात आली. तिच्या सोबत पोलीस कॉन्स्टेबल पण होते. पोलिसांनी देखील दोन दिवस आधी जाऊन तक्रार नोंदविली होती. तरीदेखील या टवाळखोर मुलांवर साधी कारवाई देखील करण्यात आली नाही. त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही. 

महिला सुरक्षेसाठी गृहखातं अपयशी

माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की, केंद्रीय मंत्री असलेल्या महिलेच्या मुलीसोबत असा प्रकार होत असतील तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना दोन दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते. या सर्व प्रकरणावरून समोर एकच लक्षात येतं की, महिला सुरक्षेसाठी गृह खाते हे अपयशी ठरलेलं आहे. पोलीस यंत्रणा कुठल्या दबावाखाली आहे? पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा काम करत आहे का? दोन दिवसापासून केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या गुन्हेगाराला अटक झालेली नाही. 

गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे

कुणाचा दबाव आहे? ते कुणाचे कार्यकर्ते आहेत? त्यासाठी राजकीय दबाव वापरून कारवाई करण्यात आली नाही. संपूर्ण मुक्ताईनगर मतदार संघ हा कुठल्या गुंडगिरीमध्ये वाढतो आहे? गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना पोलीस पाठीशी घालण्याचा काम करते. याचे उत्तर देणे आता गरजेचं आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Khadse : नातीची टवाळखोरांकडून छेडछाड, आजोबा एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप; म्हणाले, गुंडांना स्थानिक लोकप्रतिनिधीचे...

Raksha Khadse : एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या मुली बाळींचे काय? मंत्री रक्षा खडसेंचा संतप्त सवाल