Raksha khadse जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून अनेक लोकप्रतिनिधींकडून वेगवेगळ्या मतदारसंघावर दावेदारी केली जात आहे. आता एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी रावेर लोकसभा मतदारसंघावर (Raver Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा दावा केला आहे. 


रक्षा खडसे म्हणाल्या की, रावेर लोकसभेवर माझा दावा नक्कीच राहील. कारण दोन वेळेस पक्षाने मला रावेर लोकसभा लढवण्याची संधी दिली आहे. तसेच जनेतेने मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. पण शेवटी उमेदवारीचा विषय आहे त्यावर पक्ष संघटना आणि वरिष्ठ नेते ठरवतील. जो काही आदेश दिला जाईल त्या अनुषंगाने आम्ही सर्व काम करू. कारण जनतेच्या मनातील भावना आहे की नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत. त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या जास्तीत जास्त निवडून जाण्यासाठी आम्ही सर्व जण प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. 


सासरे विरुद्ध सून लढत होणार? 


रक्षा खडसे या दोन टर्मपासून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली, त्यावेळी त्या निवडून आल्या. त्यानंतर २०१९ मध्येही भाजपाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळीही त्या विक्रमी मताधिक्याने निवडून आल्या होत्या. आता तिसऱ्यांदाही त्या भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. कारण रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता जर एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीतून लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली तर सासरे विरुद्ध सून अशी लढत पाहायला मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


एकनाथ खडसेंनी भाजपामध्ये यावे ही सर्वांचीच इच्छा - रक्षा खडसे


दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे, असे रक्षा खडसे यांनी अलीकडेच म्हटले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ खडसे यांचा भाजपचा (BJP) पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार आहे, असेही त्यांनी म्हटले होते.  


शरद पवारांसोबतच राहणार - एकनाथ खडसे


अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केले आहे. मात्र काही कारणास्तव आपल्याला भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात यावे लागले. आता मात्र आपण शरद पवार यांचे नेतृत्व मान्य केलं असून पुढील काळात देखील आपण राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सोबतच राहणार. भाजपमध्ये जायचे असते तर अगोदरच गेलो असतो. कदाचित अजितदादा यांच्या सोबत गेलो असतो. मात्र आपण शरद पवार यांच्या सोबतच राहणार आहे.


आणखी वाचा 


Yugendra Pawar : दिल्लीपुढे झुकणार नाही! आजोबांच्या राष्ट्रवादीला 'तुतारी' मिळताच युगेंद्र पवारांनी रणशिंग फुंकले