Eknath khadse : भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाचा वापर करत मला टार्गेट करत असतील असा आरोप, राष्ट्रावादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर निशाणा साधला.
भोसरी जमीन प्रकरणी हेमंत गावंडे यांनी आपल्या परिवार विरोधात तक्रार दिली होती. राजकीय पदाचा दुरुपयोग करून कमी दरात जमीन खरेदी केल्याची ही तक्रार होती. या तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाने याची चौकशी एसीबीकडे दिली होती. एसीबीने याची चौकशी करून यात तक्रारीनुसार कोणतेही तथ्य नसल्याचा क्लोजर रिपोर्ट पुण्याच्या न्यायालयात दिला होता. यात कोणतेही तथ्य नसल्याने हे प्रकरण बंद करण्यात यावे, असं म्हटलं होतं. दोन हजार अठरामध्ये हा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता. आतापर्यंत यामध्ये केवळ तारखावर तारखा सुरू होत्या. आता इतक्या दिवसानंतर सरकारने याची पुन्हा चौकशी करण्यात यावी अशी मागणी हेमंत गावंडे आणि एसीबीने न्यायालयात केली होती. या मागणीनुसार न्यायालयाने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. ते या सरकारला चपराक असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
एसीबीवरही पुणे न्यायालयाने ताशेरे ओढताना म्हटलं आहे की, न्यायालयाचा आधार घेत आरोपीला म्हणजेच मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे,असं खडसे यांनी म्हटलं आहे. तपास यंत्रणा एसीबी आपल्या कर्तव्यावर प्रामाणिक नसून, सत्तेत असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या तालावर नाचत असल्याचं सांगत जबाबदार तपास यंत्रणांनी जनतेशी प्रामाणिक राहून काम केले पाहिजे, असं मत न्यायालयाने व्यक्त केल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
आरोपीवर अटकेची कायम टांगती तलवार ठेऊन आरोपीकडून काही तरी मिळविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, उदा पक्षांतर किंवा शांत बसवले जाऊ शकते. तपास यंत्रणेने केलेला तपास पाहता या मध्ये आरोपीला अटक करून कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याने याबाबतचा अंतिम अहवाल निश्चित करण्यात येण्याची आवश्यकता असल्याचं मतही न्यायालयाने व्यक्त केल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे.
ही चौकशी दीर्घकाळ न 31 जानेवारी 2023पर्यंत करून त्याचा अहवाल नायालयत सादर करण्यात यावा. त्यासाठी कोणालाही अटक करण्याची आवश्यकता नसल्याचं मत ही न्यायालयाने नोंदविले आहे, असेही खडसे यांनी म्हटलं आहे.
ही एक युनिक केस आहे की सरकार याचे समर्थन न करता विरोधात समर्थन करीत आहे. शिवाय सत्तेचा उपयोग करीत आपल्याला छळवणूक करण्याचा किंवा आपल्याकडून काहीतरी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे.तपास यंत्रणा कोणाच्या तरी तालावर नाचत असल्याचं सांगत कोर्टाने या प्रकरणात तपास यंत्रणेवर गंभीर ताशेरे ओढले आहेत. न्यायालयाचे हे ताशेरे पाहता सत्ताधारी पक्ष हा विरोधक नामशेष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
खोट्या गुन्ह्यात मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगाव दूध संघातही पोलिस तपासाच्या नावाखाली छळ केला जात आहे. भोसरी एमआयडीसी घोटाळा प्रकरणी आपल्यावर कारण नसताना विविध चौकशा लाऊन त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही खडसे म्हणाले.