जळगाव : अवैधपणे गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणी 137 कोटी रुपयांची दंडात्मक नोटीस  खडसे परिवाराला बजावल्यानंतर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी ही खडसे परिवारावर टीका केली होती. महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. थोडा वेळ वाट पाहा, कोर्टातूनच महाजन यांच्या थोबाडीत बसेल, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 


भाजपचे माजी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले की,  गौण खनिज घोटाळा प्रकरणात आपण किंवा आपल्या परिवाराने कोणतेही चुकीचे काम केलेलं नाही. केवळ राजकीय हेतूने आपल्याला आणि परिवाराचा या प्रकरणात छळ केला जात आहे. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून एसआयटी रिपोर्टमध्ये आपल्या नावाचा समावेश करण्यात आला असल्याचा आरोपही खडसे यांनी केला. निवडणुका होईपर्यंत आपला असाच छळ सुरू राहील असे दिसत असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, या सगळ्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयात आपल्याला आजपर्यंत न्याय मिळाला आहे आणि या प्रकरणातही न्याय मिळेल अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली आहे. 
 


गिरीश महाजन यांच्या थोबाडीत बसेल


चोरी केली नाही हे अगोदर सिद्ध करा मगच आमच्या विरोधात खडे फोडा असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले होता. त्याला उत्तर देताना खडसे यांनी म्हटले की, थोडा वेळ वाट पहा,महाजन यांच्या थोबाडीत बसेल वाट पाहा अशा शब्दांत खडसे यांनी महाजन यांचेवर टीका केली आहे.


शेती तयार होणार असल्याने आपण मोफत जमीन दिली आहे. यासाठी ठेकेदाराने हे काम केले आहे. याची जी रक्कम असेल ती ठेकेदाराने भरणे गरजेचे आहे. त्याला नोटीस द्यायला पाहिजे होती. मात्र राजकीय हेतूने आमचे नाव यात घालून नोटीस बजावली आहे. मात्र सत्य काय ते बाहेर येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत या विरोधात आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. 


मराठा आरक्षण बाबत मंत्री गिरीश महाजन हे संकटमोचक म्हणून वावरत असले तरी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात जाऊन स्वत: संकटात सापडले आहेत. त्यांना जे आश्वासन त्यांनी दिले होते ते पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आता गिरीश महाजन यांची आता फारशी पत शिल्लक राहिली नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 


Eknath Khadse v/s Girish Mahajan : गौण खनिज उत्खनन नोटीस प्रकरणावरुन खडसे- महाजनांमध्ये जुंपली