Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Molestation) करत तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. दरम्यान या घटनेबाबत पाचोरा भडगाव (Bhadagaon) तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही आज अधिवेशानात संशयिताला कठोर शिक्षा व्हावी असा प्रश्न मांडला. तर दुसरीकडे आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पिडीत मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला, आणि चांगल्यातला चांगला वकील लावला जाईल, संशयित आरोपीला कठोर शिक्षा होईल असे आश्वासन दिले. 


भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून (Murder) केला. त्यानंतर तिचा मृतदेह गुरांच्या गोठ्यात लपवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे गोडगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमधून संतापाच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.  या मोर्चामध्ये भडगाव तालुक्यातील विविध गावांमधील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष तसेच तरुण हे सहभागी झाल्याचे पाहायाला मिळाले. या घटनेतील संशयित तरुणाला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी भडगाव तालुक्यातील अनेक गावांमधील हजारोच्या संख्येने नागरिकांनी आज पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला. मूक मोर्चा असल्याने कुठलीही घोषणाबाजी न करता मूक पद्धतीने हा मोर्चा गोंडगाव गावातून थेट भडगाव शहरातील पोलीस ठाण्यावर पोहोचला.


पिडीत मुलीच्या मृत्यूने पिडीतेच्या आई वडीलांसह सर्व गाव सुन्न झाल्याचे पहायला मिळत आहे. मोर्चाचा पोलीस स्टेशनजवळ समारोप झाला, जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत याठिकाणाहून जाणार नाही, असा पावित्रा मोर्चात सहभागी पिडीतेच्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. त्यावर या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमीत पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पिडीतेच्या कुटुंबियांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलंण करुन दिलं. 


काय म्हणाले....फोन वरून मुख्यमंत्री 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी फोनवरुन बोलतांना सांगितलं की, विधानसभेच्या अविधेशनात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आरोपीला अटक झाली आहे, तो सुटणार नाही, यासाठी व्यवस्था आपण केली असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारखा चांगला वकील देऊ. संबंधितावर कठोर कारवाई होईल..एकदम कडक कारवाई होईल, असं आश्वासन दिलं. यावेळी पिडीत चिमुकलीच्या काकूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतांना रोष व्यक्त केला, तुम्ही कधी वकील लावणार, कधी कारवाई करणार, त्यापेक्षा संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमचं काय करायचं बघून घेऊ ...असा रोष बोलताना व्यक्त केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोरात शिक्षा होईल, असे आश्वासन पिडीत महिलेच्या काकूला दिले.


इतर संबंधित बातम्या : 


Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील घटनेनं महाराष्ट्र हादरला, आरोपीनं हत्येची कबुली दिल्याची माहिती