Maharashtra Jalgaon News : जळगाव (Jalgaon) शहरात तत्कालीन नगरपालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा (Jalgaon Housing Scam) उघडकीस आल्यानंतर सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नगरसेवकांना कारावास भोगावा लागला होता. आज हे सर्वजण जामिनावर बाहेर असले तरी यांच्यावर झालेल्या कारवाईचा धसका, या ठिकाणच्या नगरसेवकांनी आणि अधिकाऱ्यांनी चांगलाच घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून ज्या घरकुल घोटाळा प्रकरणी या सर्व लोक प्रतिनिधींना जेलची हवा खावी लागली होती, ती हजारो घरकुल अपूर्ण अवस्थेत पडून असल्यानं कोट्यवधी रुपयांची मालमत्ता अवैध धंद्यासाठी वापरली जात आहे.


जळगाव शहरांतील गरजू व्यक्तींसाठी स्वतःचं घर असावं आणि जळगाव शहर हे झोपडी मुक्त करण्याच्या उद्देशानं जळगाव मनपानं घरकुल योजना राबवली होती. यावेळी जळगाव तत्कालीन नगरपालिकेत सुरेश जैन यांच्या गटाची खानदेश विकास आघाडीची सत्ता होती. ही घरकुल योजना राबवण्यासाठी जळगाव नगरपालिकेनं हुडकोसह जिल्हा बँकेचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला होता. 1998 ते 2002 या कालावधीत अकरा हजार चारशे घरांचं काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ठ ठेवण्यात आलं होतं. यासाठी एकशे दहा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. एवढंच काय तर ही सर्व रक्कम आगाऊ रक्कम म्हणून मर्जीतील ठेकेदाराला देण्यात आली होती. ठेकेदारानं काम सुरू केल्यानंतर काही काळ काम सुरू राहिलं आणि त्यानंतर मात्र जे बंद पडलं, ते बंदच राहिलं. ठेकेदारानं अकरा हजार चारशे घरांचं उद्दीष्ट असताना पंधराशे घर त्यानं बांधली. यातील काही घराचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. तर शेकडो घरांचे काम हे अपूर्ण अवस्थेत राहिलं आहे. 


बांधकाम सुरू असताना तत्कालीन नरेंद्र अण्णा पाटील यांच्या तक्रारीची दखल घेत तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कारवाई करत अनेक नगराध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानं खळबळ उडाली होती. 




अपूर्ण राहिलेले घरकुल हे आजतागायत अपूर्णच 


या घटनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं सिद्ध झाल्यानं सुरेश जैन, गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, मेजर नाना वाणी यांसारख्या बड्या हस्तींसह 72 नगरसेवकांना जेलची हवा खावी लागली होती. या घटनेचा जळगावच्या राजकारणावर एवढा परिणाम झाला की, पालिकेवर आलेल्या कोणत्याही पक्षाच्या सत्तेनं, या घरकुल घोटाळ्याशी संबंधित घरुकुल योजनेत आपण अडकून पडू म्हणून कोणत्याही कामात हात घातला नाही. त्याचा परिणाम म्हणून जळगावच्या नागरिकांनी आपल्या करातून उभारण्यात आलेले अपूर्ण राहिलेले घरकुल हे आजतागायत अपूर्ण राहिले असल्यानं या ठिकाणी आता अवैध धंदे फोफावले आहेत. तर अनेकांनी बेकायदेशीररित्या या ठिकाणी गुरे पाळली आहेत. तर काहींनी बळजबरी कब्जा केल्याचं पाहायला मिळत आहे. 


या घरकुल योजनेशी आपला कोणताही संबंध आला तर आपल्यालाही जेलची हवा खावी लागेल. या भीतीनं आज जळगाव मनपामधील कोणताही नगरसेवक अथवा अधिकारी या भीतीपोटी हात घालायला तयार नसल्यानं कोट्यवधी रुपयांची मालमत्ता धूळ खात पडली आहे. 



म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणची घरे निष्कासित करून नवीन घरकुल योजना राबविण्याचा ठराव पालिकेत नामंजूर 


नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा मनात या घरकुल घोटाळ्याची भीती असल्यानं यात कोणी भाग घेत नसल्याचं मत महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केलं आहे. आपण म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणची घरे निष्कासित करून नवीन घरकुल योजना राबविण्याचा ठराव पालिकेत मांडला होता. मात्र त्याला सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्हीकडून विरोध झाला. हा ठराव मंजूर न झाल्यानं आज या घरकुलांची परिस्थिती आहे तशीच आहे. या ठिकाणी गुरे बांधली जात आहेत. अवैध धंदे आहेत. याची आपल्याला खंत असल्याचं मतही महापौर जयश्री महाजन यांनी व्यक्त केलं आहे. 


जळगाव तत्कालीन नगरपालिकेमधील घोटाळ्या संदर्भात स्व. नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी सातत्यानं आवाज उठविला होता. एवढंच काय तर उच्च न्यायालयातसुद्धा त्यांनी दाद मागितली होती. त्यात त्यांना यश मिळाल्यानं अनेकांना जेल भोगावी लागली. यात काही जणांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं, तर काहींचं नष्ट झालं. 


या घरकुल घोटाळा प्रकरणाचा विचार केला, तर घरकुलसाठी वापरण्यात आलेल्या जागेसह सर्वच बाबी या बेकायदेशीर केल्या गेल्या असल्यानं, या ठिकाणी नव्यानं काही काम करणंसुद्धा बेकायदेशीर होणार असल्यानं यामध्ये कोणीही नगरसेवक अथवा अधिकारी यात भाग घ्यायला तयार नाही. आणि कोणी चुकीचं काम पुन्हा करण्याचा प्रयत्न या जागेवर केला तर आम्ही पुन्हा या विरोधात आवाज उठविणार असल्याचं मयत नगरसेवक नरेंद्र पाटील यांचे बंधू अॅड. विजय पाटील यांनी म्हटलं आहे.


घरकुल घोटाळा करणाऱ्यांना नायालयाकडून शिक्षा आणि दंड करण्यात आला असला तरी या घोटाळ्याला जबाबदार असणाऱ्या आरोपींकडून जळगावकर नागरिकांच्या कराच्या रूपानं उभारण्यात आलेल्या या घरकुल योजेनेच्या अपहाराची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.